कर्मचाऱ्यांनी पुरला सांबराचा मृतदेह
By Admin | Updated: May 8, 2015 01:53 IST2015-05-08T01:53:38+5:302015-05-08T01:53:38+5:30
केहझर परिसरातील गणेशखोरी जंगलात सांबराचा मृतदेह झुडपातील खड्ड्यात फेकण्यात आला़ याबाबत वृत्त उमटताच अधिकारी,

कर्मचाऱ्यांनी पुरला सांबराचा मृतदेह
सेलू : केहझर परिसरातील गणेशखोरी जंगलात सांबराचा मृतदेह झुडपातील खड्ड्यात फेकण्यात आला़ याबाबत वृत्त उमटताच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी फेकलेला मृत सांबराचा देह उचलून गणेशखोरी जंगल शिवारात जेसीबीने खड्डा करून पूरला़ यातही शवविच्छेदन करण्यास फाटाच देण्यात आला़ यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चिले जात आहे़
सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी वाघमारे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून खोटी माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही समोर आले आहे़ केळझर नजीकच्या गणेशखोरी जंगलाच्या भोवताल सौर कुंपण लागले आहे़ या कुंपणाच्या आत सोमवारी एक सांबर मृतावस्थेत पडून असल्याची माहिती वाघमारे यांना मिळाली़ त्यांनी रितसर पंचनामा करून घटनास्थळीच पशुचिकित्सकांद्वारे शवविच्छेदन करणे व जंगल परिसरात खड्डा खणून ते पुरविणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही़ काही महिला वनरक्षकांच्या साह्याने सदर मृत सांबर दोराने ओढत आणले़ एका वाहनाने फरफटत नेऊन शेतकरी ताराचंद लोखंडे यांच्या पडीत शेतातील झुडपात मृतदेह ढकलून देत तेथून पळ काढला. हे प्रकरण वन विभागावर शेकू नये म्हणून गरीब शेतकऱ्यांना फसविण्याचा प्रयत्न वन विभागाचे अधिकारी करीत असल्याचेच दिसते़
वन विभागातील अधिकारी, कर्मचारी आपल्या चुका शेतकऱ्यांवर ढकलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते़ शवविच्छेदन केले नसताना ते सोपस्कार पार पडल्याचे सांगण्यात आले़ या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी वाघमारे व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह नागरिकांद्वारे होत आहे़(शहर प्रतिनिधी)