सुरुवातीच्या 72 तासांत ‘ट्रेस’ अन् ‘टेस्ट’वर देणार भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 05:00 AM2021-05-08T05:00:00+5:302021-05-08T05:00:02+5:30

७२.८० टक्के साक्षर असलेल्या वर्धा जिल्ह्यात सध्या कोविड विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. कोविडच्या वाढत्या संसर्गाला वेळीच ब्रेक लावण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या उद्देशाने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शनिवार (दि. ८ मे) सकाळी ७ ते गुरुवार (दि.१३ मे) सकाळी ७ पर्यंत काही कठोर निर्बंध लागू करून सक्तीच्या संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा आदेश निर्गमित केला आहे.

Emphasis will be placed on 'Trace' and 'Test' in the first 72 hours | सुरुवातीच्या 72 तासांत ‘ट्रेस’ अन् ‘टेस्ट’वर देणार भर

सुरुवातीच्या 72 तासांत ‘ट्रेस’ अन् ‘टेस्ट’वर देणार भर

Next
ठळक मुद्देइतर विभागांचेही घेणार सहकार्य : आरोग्य विभागाची कठोर निर्बंधातील रणनीती, नागरिकानी सहकार्य करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा : शनिवार सकाळी सात वाजल्यापासून पुढील पाच दिवस जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कठोर निर्बंधाची अंमलबजावणी केली जाणार आहे. याच सक्तीच्या संचारबंदीतील सुरुवातीच्या ७२ तासांत कोविड विषाणूच्या संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष रणनीती तयार केली आहे. कठोर निर्बंधाचा पाच दिवसांचा उलटा काऊंटडाऊन सुरू होताच  गृहभेटी देऊन जिल्ह्यात विशेष सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणादरम्यान संशयितांचा शोध घेऊन कोविड चाचणी करून घेतली जाणार आहे.
सन २०११ च्या जनगणनेनुसार १३ लाख ७७४ लोकसंख्या असलेल्या वर्धा जिल्ह्यात एकूण १ हजार ३८७ गावे आहेत. ७२.८० टक्के साक्षर असलेल्या वर्धा जिल्ह्यात सध्या कोविड विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. कोविडच्या वाढत्या संसर्गाला वेळीच ब्रेक लावण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या उद्देशाने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शनिवार (दि. ८ मे) सकाळी ७ ते गुरुवार (दि.१३ मे) सकाळी ७ पर्यंत काही कठोर निर्बंध लागू करून सक्तीच्या संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा आदेश निर्गमित केला आहे. याच सक्तीच्या संचारबंदीत सुरुवातीच्या ७२ तासांत आरोग्य विभाग आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, आदींच्या सहकार्याने विशेष सर्वेक्षण मोहीम राबविणार आहे. या सर्वेक्षणादरम्यान सर्दी, खोकला, ताप, घसादुखी, श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन संशयितांची कोविड चाचणी करून घेतली जाणार आहे. वेळीच नवीन कोविड बाधित शोधून त्याला चांगली आरोग्य सेवा देत कोरोना संसर्गाची सोखळी तोडणे या उद्देशाने सक्तीच्या संचारबंदीतील सुरुवातीच्या ७२ तासांत आरोग्य विभाग विशेष प्रयत्न करणार आहे. नागरिकांनीही या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

उपलब्ध आहेत तब्बल १२,५०० अँटिजन कीट
विशेष मोहिमेदरम्यान संशयितांची कोविड चाचणी करण्यासाठी तब्बल १२ हजार ५०० अँटिजन कीट सध्या आरोग्य विभागाकडे आहेत. वेळ व परिस्थिती बघून अँटिजन किंवा आरटीपीसीआर पद्धतीने संशयितांची कोविड चाचणी केली जाणार आहे.

यांची घेणार मदत
‘ब्रेक द चेन’साठी आरोग्य विभाग पोलीस व महसूल विभागाच्या खांद्याला खांदा लावून आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सुरुवातीच्या ७२ तासांत शहरी व ग्रामीण भागात विशेष सर्वेक्षण मोहीम राबविणार आहे.
 

१५ फिरत्या कोविड चाचणी व्हॅन सज्ज
सर्वेक्षण मोहिमेदरम्यान ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने संशयित आढळतील त्या ठिकाणी फिरत्या कोविड चाचणी व्हॅनसह त्यातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना पाचारण करून प्रत्येक संशयिताची कोविड चाचणी केली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात एकूण १५ फिरत्या कोविड चाचणी व्हॅन सज्ज करण्यात आल्या आहेत.

रोखता येणार उपचारांअभावी होणारे मृत्यू  
सोशल मीडियावर कोरोनाविषयी अनेक गैरसमज पसरविले जात आहेत. त्यावर अनेकांकडून विश्वासही ठेवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ७२ तासांत विशेष सर्वेक्षण मोहीम राबवून नवीन रुग्ण वेळीच ट्रेस करीत  त्याचा चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून केला जाणार आहे. यामुळे उपचारांअभावी होणारे कोविड बाधितांचे मृत्यू रोखता येणार आहे.

लसीकरणाला गती देण्याचा मानस
कठोर निर्बंधाच्या काळात जिल्ह्यात संशयितांचा शोध घेऊन त्यांची कोविड चाचणी करण्यासह लसीकरणाला गती देण्याचा मानस आरोग्य विभागाचा आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्याला शासनाकडून अतिशय तोकडा लससाठा दिला जात असल्याने विविध अडचणींना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आहे.

कोविड संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ८ मे सकाळी ७ ते १३ मे सकाळी ७ पर्यंत जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू केले आहे. याच कठोर निर्बंधाच्या सुरुवातीच्या ७२ तासांत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात ‘ट्रेस’ अन् ‘टेस्ट’ वर भर देत गृहभेटी देऊन नवीन कोविड बाधित शोधून त्याला चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘ब्रेक द चेन’ हा या विशेष मोहिमेचा उद्देश आहे. यासाठी अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, शिक्षक, ग्रा.पं. कर्मचारी, आदींचे सहकार्य घेतले जाणार आहे.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

 

Web Title: Emphasis will be placed on 'Trace' and 'Test' in the first 72 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.