वर्धा जिल्ह्यात अकराशे रुपये क्विंटलची केळी सहाशे रुपयांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 14:53 IST2020-07-15T14:52:29+5:302020-07-15T14:53:23+5:30
कोरोनामुळे केळी खाणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. परिणामी, मागणी घटली.

वर्धा जिल्ह्यात अकराशे रुपये क्विंटलची केळी सहाशे रुपयांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जानेवारी, फेब्रुवारीमध्ये केळीला प्रतिक्विंटल अकराशे रुपये भाव होता. आता त्याच केळीला प्रतिक्विंटल सहाशे रुपयांचा भाव मिळत असल्याने केळी उत्पादकांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.
कोरोनामुळे केळी खाणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. परिणामी, मागणी घटली. शेतकऱ्यांचा माल तोडणीला आला की तो कापावाच लागतो, अन्यथा नुकसान होते. त्या काळात तोडणी झालेल्या केळीला बाजारात भाव मिळाला नाही. ज्या व्यापाऱ्यांनी हा माल खरेदी करून, पिकविण्याची प्रक्रिया करून बाजारात नेला. मात्र, उठाव नसल्याने केळीचे भाव पडले. अडचणींच्या काळात शेती हंगामावर केळीपासून रोख पैसा मिळतो. त्यावर संपूर्ण शेतीचा खर्च चालतो. मात्र, यंदा एकाएकी भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. सेलू तालुक्यात सिंचन व्यवस्थेमुळे कमी झालेल्या केळीच्या बागा वाढत असताना अशा भावबाजीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता बदलत चालली आहे. तालुक्यात यंदा सोयाबीन व तुरीचा पेरा वाढला आहे. शेतकऱ्यांना फायदा मिळवून देणाऱ्या केळीच्या भावातील कोरोनामुळे झालेली घट शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची ठरली आहे.
आम्ही कॅशक्रॉप म्हणून केळीच्या बागा लावतो. खूप मेहनत घेतो. यंदा कोरोनामुळे केळीची भाव पडले. जानेवारी, फेब्रुवारीत अकराशे बाराशे रुपये क्विंटलची केळी एकदम सहाशे रुपयांवर आली. सरकारने आमचाही विचार करायला हवा.
- कवडू लटारे, केळी उत्पादक, शिवनगाव, ता. सेलू.