अपंग युवकाची वृद्ध मातेवरच भिस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2015 01:52 IST2015-04-28T01:52:56+5:302015-04-28T01:52:56+5:30
घरात अठराविश्व दारिद्र्य, एका पायाला जन्मत: अपंगत्व, वडील व भावाचे छत्र हरविलेले, आईवरच भिस्त व शासकीय

अपंग युवकाची वृद्ध मातेवरच भिस्त
शासकीय योजनांपासूनही वंचित : वडील व भावाच्या मृत्यूनंतर कुटुंबाची वाताहत
महादेव नवले ल्ल नंदोरी
घरात अठराविश्व दारिद्र्य, एका पायाला जन्मत: अपंगत्व, वडील व भावाचे छत्र हरविलेले, आईवरच भिस्त व शासकीय योजनांचाही आधार नाही, अशा भीषण स्थितीत विलास जगत आहे़ या अपंग युवकाला प्रशासन, सामाजिक संघटनांनी जगण्याचे बळ देणे गरजेचे झाले आहे़ निराधार झालेला हा अपंग युवक शासकीय मदतीची प्रतीक्षाच करताना दिसतो़
विलास काशीनाथ भुजबळ (३५) रा. नंदोरी हा युवक एक पायाने जन्मत: अपंग आहे. वडील व मोठा भाऊ मरण पावल्याने तो वृद्ध आईसोबत एका खोलीत राहतो. तो वृद्ध आईवरच विसंबून असून शासनाच्या निराधार योजनेचा लाभही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे त्याच्यापर्यंत पोहोचला नाही. एका पायाने अपंग असल्याने अंगमेहनतीची कामे तो करू शकत नाही. काही वर्षे चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील पानटपरी तो चालवित होता; पण मेंदुचा आजार जडल्याने तो कुठेही भोवळ येऊन पडत असे़ यामुळे पानटपरीही बंद केली. पैसा नसल्यास औषधीसाठीही त्याना उधारी करावी लागते़ एसटी पासशिवाय कुठलीही सवलत मिळत नाही. अपंगांकरिता शासनाच्या अनेक योजना आहे; पण एकाही योजनेचा लाभ मिळाला नाही़ यामुळे संबंधित विभाग व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत त्याला मदत मिळवून देणे अगत्याने झाले आहे़
अपंग विलासला शासकीय मदतीची प्रतीक्षा
अपंगांसाठी पीठ गिरणी ही एक योजना आहे़ यासाठी त्याने पंचायत समितीमध्ये अर्ज केला होता; पण वर्ष लोटूनही ती मिळाली नाही. श्रावण बाळ निराधार योजनेत एक वर्षापूर्वी अर्ज केला; पण अद्याप त्याला निराधाराचे अनुदान प्राप्त झाले नाही़ पेन्शन कधी मिळणार, अशी विचारणा केली असता अधिकारी उत्तर देत नाहीत़ अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे अपंगांना सरकारी योजनांपासून वंचित राहावे लागत आहे़ अर्ज करूनही योजनांचा लाभ मिळत नसल्याने विलासला शासकीय मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे़
प्रत्येक व्यक्तीकरिता योजना आहेत; पण गरजवंतांना त्यांचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे़ विलास रोजगार शोधण्याचा प्रयत्न करतो; पण अपंगत्व आणि मेंदूच्या आजारामुळे त्याला कुणी काम देण्यासही तयार होत नाही. शासकीय मदत मिळविण्याचा प्रयत्न करतो तर तीही मिळत नाही. यामुळे जगावे कसे, असा प्रश्न विलास व त्याच्या आईपूढे उभा ठाकला आहे़ लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़