आठ महिन्यांपासून शिक्षक वेतनापासून वंचित
By Admin | Updated: March 14, 2015 02:02 IST2015-03-14T02:02:41+5:302015-03-14T02:02:41+5:30
सरस्वती माता विद्या प्रसारक मंडळ ठाणेगावद्वारा संचालित नवप्रभात विद्यामंदिर ठाणेगाव येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०१४ पासून मासिक वेतन देण्यात आले नाही.

आठ महिन्यांपासून शिक्षक वेतनापासून वंचित
कारंजा (घा़) : सरस्वती माता विद्या प्रसारक मंडळ ठाणेगावद्वारा संचालित नवप्रभात विद्यामंदिर ठाणेगाव येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०१४ पासून मासिक वेतन देण्यात आले नाही. महिन्याच्या पहिल्या तारखेला वेतन मिळावे, असा दंडक असताना शिक्षण विभागाचे दुर्लक्ष व अनागोंदी कारभारामुळे शिक्षकांना मनस्ताप होत आहे़ यामुळे दैनंदिन व्यवहार व उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न शिक्षकांपुढे उभा ठाकला आहे़
सरस्वती माता विद्या प्रसारक मंडळ या संस्थेच्या दोन संचालक गटात अनेक वर्षांपासून अनेक भांडणे सुरू आहेत. काही दावे कोर्टात सुरू आहेत़ एका गटाच्या आहारी जाऊन शिक्षणाधिकारी (माध्य़) जि.प. वर्धा यांनी याच संस्थेच्या सावळी शाळेतून घसाड यांची नवप्रभात विद्यामंदिर ठाणेगाव येथे ज्येष्ठता क्रम डावलून नियमबाह्य मुख्याध्यापक पदी बदली केली. मान्यताही प्रदान केली; पण या आदेशावर दुसऱ्या गटाने आक्षेप घेतला. यानंतर आदेशाला स्थगिती देण्यात आली, तेव्हापासून या शाळेला अधिकृत मुख्याध्यापक नाही. यामुळे पवित्र शिक्षण कार्य करणाऱ्या शिक्षकांना सप्टेंबर २०१४ पासून मासिक वेतन मिळाले नाही.
शिक्षण विभागाने वेतन बिलावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार नसणाऱ्या मुख्याध्यापकांच्या (घसाड) स्वाक्षरीने हायस्कूलच्या शिक्षकांचे सप्टेंबर ते डिसेंबर २०१४ पर्यंतचे वेतन बिले स्वीकारली व मंजूर केली; पण त्याच शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाची वेतन बिले मात्र स्वीकारली नाही़ यामुळे ते वेतनापासून अद्याप वंचित आहे. मुख्यमंत्री व शिक्षण उपसंचालकांनी संस्थेच्या शेड्युल वनप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे़ याकडे लक्ष देत कारवाईची मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)
संस्थेतील सेवाज्येष्ठता यादीतील सेवाज्येष्ठ शिक्षकांना स्वाक्षरी करण्याचे अधिकार देऊन कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न त्वरित निकाली काढावा, अशा शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्पष्ट सूचना आहे; पण शिक्षणाधिकारी समस्या सरळमार्गी निकाली काढण्यास तयार नसल्याने वेतनाचा प्रश्न निर्माण झाला़ यामुळे शिक्षक न्यायासाठी आंदोलन करण्याचा तयारीत आहेत़