शिक्षण समिती म्हणते, निर्णयावर ठाम
By Admin | Updated: August 23, 2015 02:17 IST2015-08-23T02:17:26+5:302015-08-23T02:17:26+5:30
सध्या जिल्ह्यात गाजत असलेल्या जिल्हा परिषदेतील कथित शिक्षक बदली घोटाळ्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणे सुरू झाले आहे.

शिक्षण समिती म्हणते, निर्णयावर ठाम
शिक्षक बदली घोटाळा : विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार-भेंडे
वर्धा : सध्या जिल्ह्यात गाजत असलेल्या जिल्हा परिषदेतील कथित शिक्षक बदली घोटाळ्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणे सुरू झाले आहे. शिक्षण समितीने जिल्ह्यातील १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील शिक्षकांना पटसंख्या अधिक असलेल्या शाळांमध्ये तात्पूरती व्यवस्था म्हणून पाठविल्याचा पुनरुच्चार करीत याप्रकरणी विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती मिलिंद भेंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अशी मागणी केली होती. यानुसार ही पदस्थापना करण्यात आली आहे. मागील अनेक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या काळात अशा स्वरुपाचे आदेश झालेले आहे. ही बाब याच आधारावर करण्यात आली, याकडेही भेंडे यांनी लक्ष वेधले.
शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांच्या जॉब चार्टमध्ये अशा पदस्थापना करण्याची बाब नमूद आहे. याअनुषंगाने शिक्षण समितीने ठराव घेऊन जिल्ह्यातील ३९ शिक्षकांची पदस्थापना तात्पूरत्या स्वरुपात केली. याबाबत कुणाचीही तक्रार नाही. मात्र एका महिला मुख्याध्यापिकेच्या तक्रारीवरून ही कार्यवाही करण्यात आली. सदर मुख्याध्यपिका तीनदा निलंबित झाल्याचा आरोपही भेंडे यांनी केला.
अपंग समावेशित शिक्षण भरती प्रक्रियेशी नाहक आपला संबंध जोडला जात आहे. ही बाब पूर्णत: प्रशासकीय आहे. या विषयाची आपणाला काहीही माहिती नसल्याचेही सभापती भेंंडे यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय शिक्षण समितीने घेतले. त्यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरण चांगले झालेले आहे. अशात कोणतेही आरोप झाले तरी आपले काम यापुढेही सुरूच राहील व संघर्ष करीत राहू, अशा शब्दात त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले.(जिल्हा प्रतिनिधी)