पावसाळ्यातही बळीराजावर ओलिताचे संकट
By Admin | Updated: August 10, 2014 23:09 IST2014-08-10T23:09:18+5:302014-08-10T23:09:18+5:30
खरीप हंगामाला प्रारंभ झाला त्या काळापासूनच यंदा पावसाने डोळे वटारले. अशात उशिरा आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या उगविल्या. दरम्यान पावसाने पुन्हा मारलेल्या दडीमुळे उगविलेले

पावसाळ्यातही बळीराजावर ओलिताचे संकट
घोराड : खरीप हंगामाला प्रारंभ झाला त्या काळापासूनच यंदा पावसाने डोळे वटारले. अशात उशिरा आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या उगविल्या. दरम्यान पावसाने पुन्हा मारलेल्या दडीमुळे उगविलेले पीक करपण्याची भीती निर्माण झाली आहे. पाऊस आला नसल्याने शेतकऱ्यांना ओलीत करून पीक वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे. यंदा भर पावसाळ्यातही शेतातील पिकांना ओलीत करावे लागत असून शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडत आहे़
दुबार तिबार पेरणीकरून हतबल झालेल्या शेतकऱ्याने पेरलेल्या बियाण्याचे रूपांतर रोपट्यात झाले. आता पावसाने धोका दिल्याने हे रोपटे कसे जगवावे, असा प्रश्न ओलिताचे साधन नसलेल्या बळीराजापुढे पडला आहे़ उन्हाळ्यात तापते तशी उन्ह पावसाळ्यात तापत असल्याने रोपटे पुन्हा करपू लागले आहेत. ८ जून पासून खरीप हंगामाला प्रारंभ झाला. ८ जुनला मृग नक्षत्र हत्तीवाहन घेवून आले. २२ जूनला आर्द्रा नक्षत्र मोरावर आले तर ६ जुलैला पुनर्वसू नक्षत्र आले. १० जुलैला पुष्य नक्षत्र तर ३ आॅगसट पासून आश्लेषा नक्षत्र सुरू झाले. पावसाचे पाचही नक्षत्र कोरडे गेले. झालेल्या नक्षत्रात जवळपास १० ते १२ दिवस पाऊस पडला. यात जून महिन्यात १८३़९ मि़मी़ जुलै महिन्यात ३२१ मि़मी़ आॅगस्ट मध्ये आता पर्यंत ३ मि.मी़ पावसाची नोंद तालुक्यात झाली आहे.
गत आठवडाभर श्रावणातील एकही सर येथे आली नसल्याने शेतकऱ्यांनी पिकाला तुषार सिंचन व ठिंबक सिंचनाच्या सहाय्याने ओलीत करण्यात सुरुवात केली आहे़ ओलीत करायचे तर किती एकरातील पिकाचे करायचे आणि कसे करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसामोर उभा ठाकला आहे़ स्प्रिंकलर वारंवार बदलावे लागत असल्याने शेतकऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागते आहे़
नुकतेच शेतकऱ्यांनी पिकात तण वाढले म्हणून डवरणी व निंदन केले तर झाडाला आधार देण्यासाठी सरी फाडण्यात आल्या. त्यामुळे जमिनीतील ओल तुटल्या गेली. सतत तापत असलेल्या रखरखत्या उन्हामुळे जमिनीला भेगा गेल्या आहेत. पानबसन क्षेत्रालाही पावसाची नितांत आवश्यकता आहे़ ओलीताचे साधन असलेले शेतकरी कसेबसे पीक वाचविण्याचा खटाटोप करतील पण अजून काही दिवस पाऊस आला नाही तरी रोपटे जगतीलच हे सांगणे कठीण आहे़ यामुळे यंदाचा खरीप हातचा गेल्यातच आहे. (वार्ताहर)