Due to the lack of roads, the farm is decaying | रस्त्याअभावी शेतातच सडतोय शेतमाल

रस्त्याअभावी शेतातच सडतोय शेतमाल

ठळक मुद्देनिंबोली (शेंडे) येथील अडीचशे एकरांतील शेतकरी झाले कंगाल

सुरेंद्र डाफ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : पहिल्याच वर्षी निम्न वर्धा धरण १०० टक्के भरण्याचा सर्वाधिक फटका आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे) येथील शेतकऱ्यांच्या २५० एकरातील पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांचे बॅकवॉटरच्या पाण्याने वहिवाटीचे सर्व मार्ग बंद झाल्याने शेतातील कापूस, सोयाबीन, तूर शेतातच सडत असल्याचे विदारक वास्तव निंबोली (शेंडे) येथील शेतकऱ्यांच्या वाट्याला आले आहे. आता जगावे कसे या विवंचनेत या गावातील शेतकरी सापडला आहे. सोयाबीनच्या गंज्या व कापूस शेतातच सडल्याने यावर्षीचा खरीप व रबी हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. या संकटाला जबाबदार कोण, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.
निन्म वर्धा धरण यावर्षी प्रथमच शंभर टक्के भरण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. यात धरणाच्या बॅकवॉटरने विशेष म्हणजे जी शेतकऱ्यांची जमीन निम्न वर्धा प्रकल्पाकरिता अधिग्रहीत झाली नाही, अशाही शेतकºयाच्या शेतात बॅकवॉटरचे पाणी शिरल्याने वहिवाटीचे मार्ग पूर्णत: बंद झाले आहे. ५२ टक्केच शेतजमीन शिल्लक आहे. ती जमीन शासनाने घ्यावी, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. कारण ही जमीन पाण्याखाली आल्याने कसण्यायोग्य नाही. त्यामुळे आता करावे काय? व जगावे कसे या विवंचनेत निंबोली येथील शेतकरी सापडला आहे. या बॅक वॉटरच्या पाण्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस शेतातच सडत असल्याचे वास्तव आहे. यातही वहिवाटीचे मार्ग बंद आहे.
रबी हंगामासाठी शेतच उरले नाही. शेतीसाठी रस्ता द्या नाही तर उर्वरित शेतजमीन ताब्यात घ्या, अशी मागणी शासनाकडे करीत आहे. येथील ४० शेतकऱ्यांचा २५० एकरांतील सर्व शेतमाल दहा अकरा फूट खोल पाण्यात सडत आहे. शेतात जायला रस्ताच नसल्याने येथील शेतीची कामेही ठप्प आहेत. शेतात पाणी असल्याने या परिसराला सध्या बेटाचे स्वरूप आले आहे. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही सोयाबीनच्या गंज्या सडत आहेत. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची सवंगणीच केली नाही. कापूस फुटून शेत पांढरे झाले आहे. पण शेतात जाता येत नाही. वहिवाटीचा रस्ताच नाही, मग शेतात जावे कसे?
पाटबंधारे विभागाने रस्ता बनवून देण्यासाठी वहिवाट देण्याचे मान्य केले होते. मात्र, एक महिन्याचा कालावधी लोटूनही वहिवाटीचे मार्ग तयार न झाल्याने शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रस्ता तयार करून द्या नाहीतर जमीन घ्या, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांची आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. रस्त्याअभावी या परिसरातील शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या शेतमालाचे नुकसान झाले. त्याची भरपाई कोण देणार? असा सवाल केला जात आहे. शासनाने उर्वरित जमीन घ्यावी अन्यथा वहिवाटीचा पक्का मार्ग द्यावा, अशी मागणी निंबोली (शेंडे) येथील शेतकºयांची आहे. या बॅकवॉटरने खरीप आणि रबी हे दोन्ही हंगाम मात्र पाण्यात गेल्याचे चित्र आहे.

आठ एकरात कपाशी लागवड केली. गेल्या पंधरवड्यापासून शेतातील कापूस फुटून शेत पांढरे झाले आहे. मात्र, शेतात जाण्यासाठी मार्गच नाही. दहा फूट खोल पाणी रस्त्यात आहे. शेतात जावे कसे? संबंधित विभागाने पक्का रस्ता द्यावा अन्यथा आमची जमीन घ्यावी. शेतमालाच्या नुकसानीची जबाबदारी संबंधित विभागाने घ्यावी.
- अनिल काळे, शेतकरी, निंबोली (शेंडे).ता.आर्वी.

अडीच एकरात रबी हंगामातील तूर आहे. मात्र, शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही. पाण्यातून मार्ग काढावा लागतो. यात पाण्यामुळे परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढली आहे. जीव मुठीत घेऊन शेतात जावे लागते. आमच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार?
- शिवदास शेंडे, शेतकरी, निंबोली (शेंडे) ता.आर्वी.

Web Title: Due to the lack of roads, the farm is decaying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.