The drunk driver left the bus | मद्यधुंद चालक बस सोडून पळाला
मद्यधुंद चालक बस सोडून पळाला

ठळक मुद्देप्रवाशांची ताटकळ। कारंजा बसस्थानकावरील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तालुक्यातील परसोडी येथून विद्यार्थ्यांसह प्रवाशी घेऊन कारंजा बसस्थानकावर आलेल्या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला जाब विचारला असता चालकाने संधीसाधून तेथून पळ काढला. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावरच ताटकाळत थांबावे लागले. हा प्रकार शनिवारी सकाळी कारंजा बसस्थानकावर घडल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तळेगाव आगाराच्या एमएच ४० एन ८४४५ क्रमांकाच्या बसचा चालक अमोल मांगे रा. वाठोडा हा शुक्रवारी रात्री कारंजा येथून परसोडीला गेला. शनिवारी सकाळी ही बस परसोडी येथून ७०-८० विद्यार्थ्यांसह प्रवाशी घेऊन कारंजा येथे पोहोचली. तेव्हाच तो मद्यधुंद अवस्थेत होता पण, प्रवाशांच्या लक्षात आले नाही. त्यानंतर हीच बस कारंजा येथून सावद, धावसा व गवंडी येथूनही जाऊन आली. त्यानंतर वर्धेकडे जायला निघाला असता तो मद्य प्राशन करुन असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. प्रवाशांनी लगेच त्याला जाब विचारायला सुरुवात केल्याने त्याने पळ काढला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी वाहतूक नियंत्रण कक्षाला याची माहीती देत संताप व्यक्त केला.

सावद व धावसा या गावी फेरी घेऊन जाण्यापूर्वी त्याने रक्तदाब कमी झाल्याबाबत वाहतूक नियंत्रकाला सांगितले होते. यापूर्वीही तो निलंबित झाला आहे. सोमवारी याबाबत अहवाल तयार करुन विभागीय वाहतूक अधीक्षकांकडे पाठवून त्याच्यावर योग्य कार्यवाही केली जाईल.
एस.पी.पांडे, आगार व्यवस्थापक, तळेगाव


Web Title: The drunk driver left the bus
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.