वर्धा : पावसाळा सुरू होवून दीड महिन्याचा कालावधी होत आहे. पाऊस येणारे नक्षत्र कोरडे जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या धोक्यात आल्या आहेत. जलाशयाची पातळी धोक्यात आली आहे. असे असताना पावसाचा अद्याप पत्ता नाही. पावसाच्या या दडीमुळे जिल्ह्यावरील दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. जिल्ह्यात शुक्रवारी पाऊस आला मात्र तो क्षणाचाच ठरला. यामुळे समस्या अधिकच बिकट झाली आहे. आतापावेतो जिल्ह्यात ४०० ते ५०० हेक्टरमध्ये पेरणी झाली, परंतु पाण्याच्या अभावाने शेतकऱ्यांवर आज घडीला दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांनी शेतात पेरलेले बियाणे पावसाअभावी उगविले नाही. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, अशी मागणी जिल्ह्यातील विविध संघटनांच्यावतीने करण्यात येत आहे. या मागणीकरिता धरणे देणे व प्रशासनाला निवेदन देण्याचे प्रकार सुरू झाले आहे. अनेक सामाजिक संघटनांनी या मागणीकरिता जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. गत वर्षी अतिवृष्टी व यंदा कोरडा दुष्काळामुळे झालेली नापिकी, यात झालेली आर्थिक कोंडी, सावकारी कर्जाचा वाढता तगादा यातून मार्ग काढत शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र पावसाच्या नक्षत्रांनी दगा दिला. शेतकऱ्यांच्या बी-बियाणेचे नुकसान झाले. आता दुबार पेरणीसाठी पैसे शेतकऱ्यांजवळ राहिले नाही. अशात पुन्हा सावकाराकडे उंबरठे झिंजवल्या शिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्याव अथवा त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीचे निवेदन कोरा येथील नागरिकांनी तहसीलदारांना दिले. शिष्टमंडळात रोशन चौके, प्रभाकार जिवतोडे, किशोर नेवल, भालचंद्र नाहर, मंगेश देशमुख, राजेंद्र कावळे, झाडे, पाटील, बाबा नारनवरे, मनोहर कन्नाके, अवचट, डोमाजी लोखंडे, श्रीराम वरघणे, लक्ष्मण पुसदेकर, विनोद जांभुडे, सुनिल नारनवरे तसेच परिसरातुन शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरा परिसरात सर्कलमध्ये दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. सर्केल मध्ये २० ते २५ गावे संकटात सापडली असून त्यांना मदत देण्याची मागणी आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)किसानसभेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन-जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी २५ हजार रुपये मदत शासनाने तातडीने जाहीर करावी, दुबार पेरणीसाठी शासनाच्यावतीने मोफत बियाणे द्यावे, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे. शेतकऱ्यांना पेंशन योजना लागू करावी. जंगली प्राण्यांचा त्रास वाढला असल्याने वनविभागाने संरक्षण द्यावे, वन कामगारांना न्याय द्यावा या आशयाचे निवेदन राजू गोरडे यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना देत त्यांच्यासोबत चर्चा केली.-वर्धा वन मंडळातील काम करणाऱ्या वनकामगारांचे वेळेवर वेतन होत नाही. त्यांना कामावरुन कमी करण्यांच्या धमक्या रेंजर देतात. कुशल कामगाराप्रमाणे वेतन मिळत नाही. वर्धा वनविभागाने वन कामागारांना न्याय न दिल्यास वनसंरक्षक कार्यालयासमोर लवकरच उपोषण आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. निवेदन देतेवेळी रामकृष्ण महल्ले, कृष्णा इंगळे, राहुल मुनेश्वर, संतोष चांभारे, दिनेश मुरार, बाबाराव खडतकर, देवराव खडसे, दिनकर झाडे, सुरेश धारे यांच्यासह अन्य शेतकरी व वनकामगार उपस्थित होते. धरणाचे पाणी सोडण्याची मागणीपावसाचे नक्षत्र पूर्णत: कोरडे गेल्याने शेतातील सोयाबीन व कापूस अपूऱ्या पावसामुळे नष्ट झाले. या पिकांना ओलित करता यावे, याकरिता धरणाचे पाणी सोडण्याची मागणी हमदापूर परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. सोबतच गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने चारा डेपो लावण्यात येण्याची मागणीही करण्यात आली आहे. यावेळी सेलू तालुका सरचिटणीस हरिभाऊ विचोरे, तालुका उपाध्यक्ष मुकींद गावंडे, भाजपा अध्यक्ष सिद्धेश्वर चरडे, गजानन नागतोडे उपस्थित होते. बाभुळगांव (खोसे) परिसरातील पिके धोक्यात पावसाच्या दडीने बाभुळगाव (खोसे) येथील पिके धोक्यात आली आहेत. प्रारंभी पाऊस आल्याने कपाशी, तूर, सोयाबीनची लागवड केली, परंतु पाऊस आला नसल्याने शेतकऱ्यांचे बियाणे वाया गेले आहे.शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती उभी केली त्यातही दुबार पेरणीचे संकट आल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत नाजुक झाली. यामुळे शासनाने बियाणे, खत मोफत देण्याची मागणी आहे. निवेदन देताना मुरलीधर टावरी, अनिल भुजाडे, देशमुख, राम महल्ले, वासुदेवराव आत्राम, मधुकर आत्राम, रमेश मसराम, कुंडलीक डाहाटे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद
By admin | Updated: July 12, 2014 23:50 IST