निसर्गसंहारक विकास नकोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 05:00 AM2020-08-10T05:00:00+5:302020-08-10T05:00:42+5:30

वर्धा ते सेवाग्राम या मार्गावर रुंदीकरण व सौंदर्यीकरणाच्या नावावर राष्ट्रपिता महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि त्यांच्या काळात लावलेली ७० ते ८० जुनी डेरेदार वृक्ष तोडले जात आहे. गेल्या दोन दशकांपासून लावलेल्या वृक्षांची कत्तल सुरू असल्याने ही वृक्षतोड न करता वृक्ष सुरक्षित ठेवून विकास कामे करावी, अशी मागणी शनिवारी सायंकाळी पर्यावरणप्रेमी व वर्धेकरांनी पालकमंत्री सुनील केदार यांना निवेदनातून केली.

Do not deny the development of nature! | निसर्गसंहारक विकास नकोच!

निसर्गसंहारक विकास नकोच!

Next
ठळक मुद्देक्रांतिदिनी पर्यावरणप्रेमींचा एल्गार : वृक्षतोड थांबवा, अन्यथा चिपको आंदोलनाचा निवेदनातून इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम/वर्धा : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांना गती दिल्या जात आहे. यातूनच रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी परिसरातील डेरेदार वृक्ष आडवे केले जात आहेत. जवळपास ७० वृक्ष जमीनदोस्त केले असून १७० वृक्ष तोडण्याची तयारी सुरू असल्याने ‘हा निसर्गसंहारक विकास नकोच’ अशी भूमिका घेत क्रांतिदिनी वर्ध्यातील पर्यावरणप्रेमी एकत्र आले. त्यांनी ही वृक्ष तोड थांबवा, अन्यथा चिपको आंदोलन करू, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
वर्धा ते सेवाग्राम या मार्गावर रुंदीकरण व सौंदर्यीकरणाच्या नावावर राष्ट्रपिता महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि त्यांच्या काळात लावलेली ७० ते ८० जुनी डेरेदार वृक्ष तोडले जात आहे. गेल्या दोन दशकांपासून लावलेल्या वृक्षांची कत्तल सुरू असल्याने ही वृक्षतोड न करता वृक्ष सुरक्षित ठेवून विकास कामे करावी, अशी मागणी शनिवारी सायंकाळी पर्यावरणप्रेमी व वर्धेकरांनी पालकमंत्री सुनील केदार यांना निवेदनातून केली. यादरम्यान चर्चा करण्यात आली; पण त्यावर समाधानकारक तोडगा निघाला नाही. रविवारी सकाळी या मार्गावर पुन्हा वृक्षतोड सुरूच असल्याचे निदर्शनास आल्याने सर्वांनी धाव घेत वृक्षतोड थांबविली. यावेळी डॉ. उल्हास जाजू, करुणा फुटाणे, सुषमा शर्मा, संजय इंगळे तिगावकर, डॉ. नितीन गगणे, सुचि सिन्हा, डॉ. विठ्ठल साळवे, डॉ. अजित प्रसाद जैन, डॉ. ओमप्रकाश गुप्ता, ओजस सु.वि., मुरलीधर बेलखोडे, डॉ. विभा गुप्ता, डॉ. सचिन पावडे, अशोक बंग, सुधीर पांगूळ, प्रा. किरण जाजू, प्रदीप दासगुप्ता, डॉ. लोकेश तमगिरे, डॉ. सोनू मोर, डॉ. प्रणाली कोठेकर, डॉ. सुमेध जाजू, मालती देशमुख, अव्दैत देशपांडे, प्रभाकर पुसदकर, डॉ. आलोक बंग, डॉ. अनुपमा गुप्ता, दिलीप विरखडे, राहुल तेलरांधे, सचिन घोडे, अतुल शर्मा, अनिल फरसोले, निरंजना मारु, अ‍ॅड. पूजा जाधव, अ‍ॅड. कपिलवृक्ष गोडघाटे, मुकेश लुतडे, जीवन अवथरे, किशोर अमृतकर, शरद ताकसांडे, भाग्यश्री उगले, मोहित सहारे, गुरुराज राऊत, वरुडचे सरपंच वासुदेव देवढे याच्यासह असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

रस्ता रुंदिकरणाकरिता १६० वृक्ष तोडायची आहेत. रस्त्याच्या मधात झाड राहिले तर ते अपघातास कारण ठरु शकते. पर्यावरणप्रेमींच्या भावना समजून घेत पुन्हा पाहणी करुन किती वृक्ष वाचविता येतात, हे बघून पुढील कार्यवाही करणार. तसेच तोडलेल्या वृक्षांच्या तुलनेत अधिक वृक्ष लावली जातील.
गजानन टाके, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

शनिवारला मोठ्या प्रमणावर झाडे तोडण्यात आली. पर्यावरणाच्या दृष्टीने हे योग्य नाही. पालकमंत्री सुनील केदार यांना निवेदन दिले आणि झाडे तोडण्याची प्रक्रिया थांबविण्यास सांगितले. तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्या स्वीय सहाय्यकाने याबाबत आश्वस्त केले.
सुषमा शर्मा, संचालिका आनंद निकेतन, सेवाग्राम

बापू कुटी-सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमी व सामाजिक संघटना सातत्याने करीत आहेत. मात्र, प्रशासन वृक्षतोड करुन जागतिक वारसा स्थळासाठी आवश्यक निकषांना तिलांजली देत आहे. ज्या महात्मा गांधींनी अतिरेकी विकासाला नाकारत वृक्ष संवर्धनाला प्राधान्य दिले, त्याच महात्म्याचा १५० वा जयंती महोत्सव वृक्षांची कत्तल करुन साजरा करण्यात येतो, ही अत्यंत खेदाची बाब आहे.
संजय इंगळे तिगावकर, बहार नेचर फाउंडेशन

सेवाग्राम परिसरातील दीर्घजीवी वृक्षांची होणारी कत्तल ही अस्वस्थ करणारी आहे. वीस वर्षांपूर्वी निसर्ग सेवा समिती व बापूराव देशमुख स्मारक समिती द्वारे लावलेल्या असंख्य वृक्षांची एकाच दिवशी कत्तल करण्यात आली. ही झाडे जगविण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. या वृक्षतोडीमुळे पक्षांचा अधिवास धोक्यात आला आहे. जैव विविधता, वन, वन्यप्राणी यांच्या संवर्धनासाठी आम्ही विकासाच्या मॉडेल पुढे कमी पडतो आहे.
मुरलीधर बेलखोडे, अध्यक्ष निसर्ग सेवा समिती

Web Title: Do not deny the development of nature!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.