वेतनातील अनियमिततेमुळे शिक्षकांमध्ये असंतोष
By Admin | Updated: February 23, 2015 01:51 IST2015-02-23T01:51:58+5:302015-02-23T01:51:58+5:30
जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतनाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही़ जि़प़ प्राथमिक शिक्षकांचे डिसेंबर २०१४ चे वेतन ३० जानेवारीनंतर तर जानेवारी २०१५ च्या..

वेतनातील अनियमिततेमुळे शिक्षकांमध्ये असंतोष
वर्धा : जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतनाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही़ जि़प़ प्राथमिक शिक्षकांचे डिसेंबर २०१४ चे वेतन ३० जानेवारीनंतर तर जानेवारी २०१५ च्या वेतनाची अद्यापही प्रतीक्षाच आहे़ यामुळे शिक्षकांत असंतोष पसरला आहे़ जि़प़ शिक्षण विभागाने याकडे लक्ष देत वेतनातील अनियमितता दूर करावी, अशी मागणी होत आहे़
फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असताना अद्याप जानेवारी महिन्याचे वेतन प्राथमिक शिक्षकांना देण्यात आलेले नाही़ शिक्षक व संघटनांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास शासनाकडून वेतनासाठी पूर्ण अनुदान लवकर प्राप्त होत नसल्याचेच सांगितले जाते़ ही जर बाब खरी असेल तर अन्य जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन नियमित कसे होतात, असा प्रश्न शिक्षक उपस्थित करीत आहेत़ गांधी जिल्ह्याशी मंत्रालय दुजाभाव तर करीत नाही ना, अशीही चर्चा होत आहे़ जि़प़ शिक्षकांना एक महिना उशीराने वेतन देऊन मुद्दाम मानसिक त्रास देण्याचा प्रकार तर केला जात नाही ना, असा संशयही शिक्षकांद्वारे व्यक्त केला जात आहे़
सध्या शिक्षकांचे वेतन वर्षभरही मार्च एन्डींग असल्यागतच होतात़ शालार्थ वेतन प्रणालीप्रमाणे वेतन करता येत नसेल तर आॅनलाईन वेतनाचा देखावा का, जुन्याच पद्धतीने वेतन का केले जात नाही, हाही प्रश्नच आहे़ वेतनातील अनियमिततेमुळे प्राथमिक शिक्षकांत संताप व्यक्त होत आहे़ शिक्षण विभागातील वरिष्ठांनी याची चौकशी करून कारवाई करावी व वेतनातील अनियमितता दूर करावी, अशी मागणी शिक्षकांद्वारे करण्यात येत आहे़(कार्यालय प्रतिनिधी)