जलशुद्धीकरण केंद्राची दुरवस्था

By Admin | Updated: February 23, 2015 01:43 IST2015-02-23T01:43:26+5:302015-02-23T01:43:26+5:30

शहीद भूमीला शुद्ध पाणी मिळावे म्हणून सुमारे २५ वर्षांपूर्वी जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली; मात्र देखभाल व दुरूस्ती अभावी या केंदाची दुरवस्था झाली आहे.

Disease of the water purification center | जलशुद्धीकरण केंद्राची दुरवस्था

जलशुद्धीकरण केंद्राची दुरवस्था

लोकमत विशेष
अमोल सोटे आष्टी (शहीद)
शहीद भूमीला शुद्ध पाणी मिळावे म्हणून सुमारे २५ वर्षांपूर्वी जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली; मात्र देखभाल व दुरूस्ती अभावी या केंदाची दुरवस्था झाली आहे. यातील यंत्रसामग्री गंजली असून त्यातून होणाऱ्या शुद्धीकरणावरच प्रश्न निर्माण झाला आहे. हेच पाणी नागरिकांच्या पिण्यात जात असल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
आष्टी, नवीन आष्टी, पेठअहमदपूर या तिनही गावांना याच जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. ममदापूर तलावातील पाणी शुद्ध करून ते नळाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले जात आहे. या केंद्राकडे संबंधीत विभागाने दुर्लक्ष केले. शुद्धीकरणासाठी अस्तित्त्वात असलेल्या यंत्राचे भाग मोठ्या प्रमाणात गंजले आहेत. याचा विवरीत परिणाम जलशुद्धीकरणावर होत आहे.
एका उंच टेकडीवर उभारण्यात आलेल्या या केंद्राजवळ पोहचण्याकरिता रस्ताही नाही. खडतर प्रवास करून टेकडीवर जावे लागत आहे. ईमारतीला जागोजागी तडे गेले असून तिथे लावण्यात आलेल्या टाईल्स फुटल्या आहेत. गोल रिंंगण गंजल्याने कधीही तुटण्याची शक्यता आहे. जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता ३.६ दशलक्ष लीटर प्रतिदिन आहे. वाढीव पाणीपुरवठ्याचाही भार यावर देण्यात आला आहे.
पाणी शुद्धीकरण करण्याकरिता असलेल्या या केंद्रावर पाणी शुद्ध होते वा नाही याबाबत शंका निर्माण होत आहे. येथे तुरटी, ब्लिचिंग पावडर याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. शासन राष्ट्रीय पेयजल योजनेमधून पाणीपुरवठ्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च करते; परंतु इमारत व यंत्राच्या नवीन खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही.
नागरिकांच्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी अत्यावश्यक बाब झाल्याने शासनाच्या ढिसाळ कारभाराचा त्याला फटका बसत आहे. यामुळे अस्तित्त्वात असलेल्या योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने या जलशुद्धीकरण केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
जलशुद्धीकरण केंद्रामध्ये तलाव व कालव्याचे येणारे पाणी दुर्गंधीयुक्त व दुषित असल्याची नागरिकांकडून ओरड होती. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्राला नव्याने पाण्याची टाकी बांधणे, यंत्रसामग्री विकत घेण्यासह अप्पर वर्धा धरणातून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. १९६० पासूनची आष्टी शहरात असलेली पाईपलाईन बदलविण्याकरिता जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला पालकमंत्र्यांनी मंजुरी दिल्याची माहिती आहे.
सात कोटींचा खर्च अपेक्षित
जलशुद्धीकरण केंद्राच्या टाकीचे बांधकाम, पाईपलाईन बदलविणे आणि यंत्र खरेदी यासाठी एकूण सात कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या कामाकरिता सात कोटीपैकी किती निधी मिळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेमधून निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे.
आष्टी येथील जलशुद्धीकरण केंद्राची दुरूस्ती, पाईपलाईन बदलविणे, टाकीचे बांधकाम प्रस्तावाला राष्ट्रीय पेयजल योजनेमधून मंजुरी देण्यात येईल. शासनाच्या योजना ग्रामीण व शहरी भागात यशस्वी करण्याचे काम सुरू आहे.
- सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री, वर्धा जिल्हा.
आष्टी शहरातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा व जलशुद्धीकरण केंद्राची दुरूस्ती करण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. निधी मंजूर होताच कामाला सुरूवात करण्यात येईल.
- अशोक विजेकर, उपसरपंच ग्रामपंचायत, आष्टी (शहीद)

Web Title: Disease of the water purification center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.