‘बॅरिकेट्स, ड्रम’ लावणार वाहतुकीला शिस्त

By Admin | Updated: August 3, 2015 01:58 IST2015-08-03T01:58:10+5:302015-08-03T01:58:10+5:30

शहरातील वाहतुकीचा पचका झाला आहे. कुठलीही शिस्त नसल्याने कुठूनही कशीही वाहने भरधाव जाताना दिसतात.

Discipline of transport to barricades, drums | ‘बॅरिकेट्स, ड्रम’ लावणार वाहतुकीला शिस्त

‘बॅरिकेट्स, ड्रम’ लावणार वाहतुकीला शिस्त

वर्धा : शहरातील वाहतुकीचा पचका झाला आहे. कुठलीही शिस्त नसल्याने कुठूनही कशीही वाहने भरधाव जाताना दिसतात. यावर चाप लावण्याकरिता वाहतूक विभागाने सध्या पुढाकार घेतल्याचे चित्र आहे. शहरातील मुख्य चौक असलेल्या बजाज चौकात संपूर्ण वाहतूक पुतळ्याला वळसा देऊनच व्हावी यासाठी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. शिवाय पुतळ्याभोवती पांढरा रंग देऊन ड्रम लावल्याने वाहतुकीला शिस्त लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहरातील मुख्य चौक असलेल्या बजाज चौकात अरूंद उड्डाण पुलामुळे वाहतुकीचा खोळंबा होता. एखादे वाहन नादुरूस्त झाले तर वाहनांच्या रांगा लागतात. परिणामी, बजाज चौकातही वाहतुकीचा खोळंबा होतो. हाच प्रकार शहरातील प्रत्येक चौकात पाहावयास मिळतो. बाजार ओळींमध्ये दररोज वाहनांचा खोळंबा होतो. वाहतूक विभागाने अनेक उपाययोजना राबविल्या; पण त्यावर कायम अंमल होत नसल्याने त्याही कुचकामीच ठरत असल्याचे दिसते. तत्पूर्वी शहरातील वाहतूक नियंत्रक दिवे सुरू करण्यात आले होते; पण तांत्रिक कारणांमुळे ते दिवेही गत कित्येक दिवसांपासून बंद आहेत. वाहतूक पोलिसांद्वारे केवळ वाहन चालकांना दंड करण्यावर भर दिला जात होता; शहरातील वाहतूक सुधारण्याकडे लक्ष दिले जात नव्हते. नवीन पोलीस अधीक्षकांनी शहरातील विस्कळीत वाहतुकीची पाहणी केली. यानंतर दिलेल्या काही सूचनांवरून बजाज चौकात वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
बजाज चौकात चारही रस्त्यांना बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. यामुळे प्रत्येक रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना पुतळ्याला वळसा देऊनच जावे लागेल. शिवाय पुतळ्याभोवती पांढरा रंग लावून ड्रम लावण्यात आले आहेत. या ड्रममुळे कुठलीही वाहने पुतळ्याच्या एकदम जवळ जाऊ शकणार नाही. सर्व रस्त्यांवरून येणारी वाहने पुतळ्याला वळसा देऊन जाणार असल्याने वाहतुकीला शिस्त लागेल, अशी अपेक्षा वाहतूक पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. शहरातील सर्व चौकांत हा प्रयत्न होणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
आॅटोच्या वाहतुकीवर नियंत्रण गरजेचे
शहरातील बजाज चौकात वाहतूक पोलिसांकडून बॅरिकेट्स, ड्रम लावण्यात आले आहेत. यातून वाहतुकीची शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असले तरी या चौकातील रस्त्याच्या कडेला असलेल्या फळ, भाजी विक्रेत्यांच्या बंड्या, आॅटोची मनमानी वाहतूक यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे झाले आहे. बजाज चौकाच्या चारही बाजूला आॅटो स्टॅण्ड आहे. यामुळे प्रवाश्यांचीही तेथे गर्दी पाहावयास मिळते. उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला आॅटो स्टॅण्ड असून तेथूनच प्रवाश्यांची ने-आण केली जाते. यामुळेही चौकात वाहतुकीचा खोळंबा होतो. यामुळे वाहतूक पोलिसांना आॅटो वाहतुकीवर नियंत्रण मिळविणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे.
रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या फळ, भाजी विक्रीच्या बंड्यांकरिता अन्यत्र पर्यायी व्यवस्था करून देणे गरजेचे आहे. यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेतल्यास वाहतूक व्यवस्था आणखी सुरळीत होण्यास हातभारच लागेल.

Web Title: Discipline of transport to barricades, drums

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.