रिकाम्या भूखंडांवर घाणीचे साम्राज्य

By Admin | Updated: October 19, 2016 01:24 IST2016-10-19T01:24:55+5:302016-10-19T01:24:55+5:30

शहरातील नवीन वॉर्डातील वसाहतीमध्ये रिकाम्या भूखंडांवर गवत, झाडे, केरकचरा वाढला आहे. घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने डास व इतर रोगजंतूचा प्रभाव वाढला. परिणामी, चिकणगुणिया, डेंग्यू, कावीळ आणि ...

Dirt empire on vacant plots | रिकाम्या भूखंडांवर घाणीचे साम्राज्य

रिकाम्या भूखंडांवर घाणीचे साम्राज्य

आजारांच्या प्रमाणात वाढ : प्रत्येक घरी आढळतोय किमान एक रुग्ण
अरुण फाळके  कारंजा (घा.)
शहरातील नवीन वॉर्डातील वसाहतीमध्ये रिकाम्या भूखंडांवर गवत, झाडे, केरकचरा वाढला आहे. घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने डास व इतर रोगजंतूचा प्रभाव वाढला. परिणामी, चिकणगुणिया, डेंग्यू, कावीळ आणि व्हायरल फिवरचे प्रमाण वाढले आहे. शहरातील प्रत्येक घरी किमान एक रुग्ण आढळून येत आहे. शहरातील दवाखाणे फुल्ल आहेत. डॉक्टरांना सुगीचे दिवस आले असून जनता हवालदिल आहे. नगर पंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने जनतेच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
नवीन वॉर्डातील अनेक रिकाम्या खासगी भूखंडांवर प्लॉट मालकाने बांधकाम केले नाही. ले-आऊटमधील सार्वजनिक कामासाठी सोडण्यात आलेल्या रिकाम्या जागेवर नगर पंचायतने तार कुंपण लावले नसल्याने शेजारचे लोक तेथे कचरा आणून टाकतात. शिल्लक अन्न टाकले जाते. यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या रिकाम्या भूखंडांवर झाडे, झुडपे, गवत वाढले आहे. परिणामी, साप व इतर किटकांचा तसेच डास व माशांचा प्रार्दूभाव वाढला आहे. घाणीमुळे चिकणगुणिया, डेंग्यु, हिवताप, कावीळ आणि व्हायरल आजारांचे प्रमाण शहरात वाढत असल्याचे दिसते.
यावर नियंत्रण करण्यासाठी नगर पंचायत व आरोग्य विभागाने नियमीत सामूहिक फवारणी करणे गरजेचे आहे. सध्या प्रत्येक घरात वरील प्रकारचा किमान एक तरी रुग्ण दिसून येत आहे. एकाला हा आजार झाला की, पूर्ण घर आजाराने ग्रस्त होते. ताप, डोके, हात, पाय दुखणे व सांध्यामध्ये सुज निर्माण होऊन अत्यंत वेदना होणे ही लक्षणे दिसून येत आहेत. जवळपास एक आठवडा रुग्ण कुणाच्या उपयोगी पडत नाही. ग्रामीण रुग्णालयासह खाजगी दवाखान्यांतही रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.
यापूर्वी ग्रा.पं.ने बांधलेल्या नाल्या उघड्या असल्याने डासांचा त्रास अधिक होतो. नगर पंचायतला शासनाने शहर विकास फंड उपलब्ध करून दिला नसल्याने नाल्यांची दुरूस्ती वा नवीन बंद नाल्यांचे बांधकाम वा इतर कामे नगर पंचायत प्रशासनाला करता आली नाही. जिल्ह्यातील इतर तीन नगर पंचायतींना पाच कोटीचा विकास फंड शासनाने उपलब्ध करून दिला; पण कारंजा नगर पंचायतला जाणीवपूर्वक डावलण्यात आले. यामुळे शहर विकासाची सर्व कामे ठप्प आहेत.
खासगी रिकाम्या भूखंडांवरील गवत, झाडे, केरकचरा काढण्यासाठी नगर पंचायतने संबंधित प्लॉट धारकांना सूचना देत कार्यवाही करावी. शिवाय नगर पंचायत प्रशासनाच्या अधिकारात असलेल्या रिकाम्या सार्वजनिक जागांना तारांचे कुंपण करून भूखंड स्वच्छ ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरात पसरलेल्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाने पुढाकार घेत शहरात स्वच्छता मोहीम राबविणे आणि औषधांची फवारणी करणेही गरजेचे झाले आहे.

Web Title: Dirt empire on vacant plots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.