शाळेची जीर्ण इमारत ठरतेय धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:00:24+5:30
शाळेतील विद्यार्थी नवीन इमारतीत शिक्षणाचे धडे घेत असले तरी लागूनच असलेल्या जुन्या जीर्ण इमारतींमुळे अपघाताचा धोका बळावला आहे. या इमारती विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. विद्यार्थी खेळण्याच्या तासात जीर्ण इमारतीत किंवा त्या इमारतीजवळ खेळण्यास जात असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.जुन्या इमारतींचे छत उडाले असून भिंतीही पडल्या आहेत.

शाळेची जीर्ण इमारत ठरतेय धोकादायक
लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी) : सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इमारती नवीन बांधण्यात आल्या आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेच्या नवीन इमारतीत शिक्षण घेत आहे. परंतु, जुन्या जीर्ण झालेल्या इमारती विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरणार आहे. याकडे मात्र, शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून जुन्या जीर्ण इमारती तत्काळ पाडण्याची मागणी होत आहे.
काही वर्षांपूर्वी शासनाने सर्व शिक्षा अभिायानंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी कोटी रुपयांचा निधी खर्च करून नवीन शाळेच्या इमारतींचे बांधकाम केले. शाळेतील विद्यार्थी नवीन इमारतीत शिक्षणाचे धडे घेत असले तरी लागूनच असलेल्या जुन्या जीर्ण इमारतींमुळे अपघाताचा धोका बळावला आहे. या इमारती विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. विद्यार्थी खेळण्याच्या तासात जीर्ण इमारतीत किंवा त्या इमारतीजवळ खेळण्यास जात असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.जुन्या इमारतींचे छत उडाले असून भिंतीही पडल्या आहेत. भंगार अवस्थेत या जीर्ण इमारती उभ्या असून साप, विंचू आदी सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार असतो.
काही दिवसांतच पावसाळ्याला सुरूवात होणार असून पावसाने जीर्ण इमारती पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
याप्रकाराबात गावातील नागरिकांनी अनेकदा लोकप्रतिनिधींना तसेच शिक्षण विभागाला माहिती देऊनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केल्या गेले. संभाव्य धोका टाळण्यासाठी शिक्षण विभागाने याकडे लक्ष देत तत्काळ जुन्या जीर्ण इमारती पाडण्यात याव्या, मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
जि.प.शाळेचे किचन शेड दुर्लक्षित
येथील जि.प. केंद्र शाळेतील किचनशेड प्रसाधनगृहालगतच उभारण्यात आले आहे. किचनशेडमध्येच पोषण आहार शिजविल्या जाते. आगामी दिवस हे पावसाळयाचे असून पोषण आहारावर माशा बसून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. याची माहिती आर्वी येथील गटविकास अधिकाऱ्यांना माहिती असूनही दुर्लक्ष केल्या जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिक्षण विभागाने याची दखल घेत जीर्ण झालेली इमारत पाडण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.