Dhaba driver cricketer's six in selfless service | ढाबाचालक क्रिकेटपटूचा नि:स्वार्थ सेवाभावात षट्कार

ढाबाचालक क्रिकेटपटूचा नि:स्वार्थ सेवाभावात षट्कार

ठळक मुद्देभिंडर परिवाराचे औदार्य : लॉकडाऊन काळात ३० हजारावर मजुरांना आधार

आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात अनेक वाटसरुंना उपाशापोटी घराची वाट धरावी लागली. सर्व हॉटेल व खानावळी बंद असल्याने अबालवृद्धांना थुंकी गिळूनच आपला प्रवास करावा लागला. मात्र, याही काळात नागपूर-अमरावती महामार्गावरील तळेगाव (श्याम.पंत) येथील क्रिकेटपटू असलेल्या भिंडर परिवाराचा ढाबा अन्नछत्रच ठरला. दोन महिन्याच्या कालावधीत या ढाब्यावर दिवसरात्र तीस हजारावर वाटसरुंना मोफत अन्नदान करून त्यांच्या पोटाची भूक क्षमविण्याचा नि: स्वार्थ सेवाभाव जपत आहे.
सोमी भिंडर असे या ढाबा चालकाचे नाव असून त्यांचा वडिलोपार्र्जित हा व्यवसाय आहे. अमरावती-नागपूर महामार्गालगत तळेगाव (श्याम.पंत.) येथे हॉटेल रायसिंग सेव्हन नावाचा ढाबा आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व हॉटेल व खानावळी बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. अशातच उन्हाचे चटके सहन करीत मजुरांचे जथ्थे कधी वाहनातून तर कधी पायदळ वाटचाल करीत होते.
रस्त्याने मिळेल ते खावून आपला पुढचा प्रवास करीत होते. ही हृदयद्रावक परिस्थिती पाहून सोमी भिंडर व त्यांची पत्नी रिना भिंडर या दाम्पत्याने वाटसरु करिता अन्नछत्र सुरु करण्याचे ठरविले. तळेगावचे ठाणेदार रवी राठोड यांना माहिती देवून त्यांच्या सहमतीने वाटसरुंना मोफत जेवण देण्याचा कार्यक्रम हाती घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून ते वाटसरुंना मोफत जेवण व नाश्ता देत आहे. आतापर्यंत त्यांनी ३० हजारावर वाटसरुंना आधार दिला असून त्यांना या कार्यामध्ये पोलीस, शिक्षक विलास पखाले आणि मित्र मंडळीचे मोठे सहकार्य मिळत आहे. या अभिनव उपक्रमामुळे अनेक गरजूंना दिलासा मिळाला आहे.

महेंद्रसिंग धोनीमुळेच बदलले ढाब्याचे नाव
सोमी भिंडर व रोमी भिंडर हे दोघेही बंधू क्रिकेटपटू आहेत. सध्या रोमी भिंडर हे राजस्थान रॉयल्स संघाचे व्यवस्थापक तर ढाबाचालक सोमी भिंडर हे सराव समन्वयक आहेत. या दोन्ही बंधूनी वडिलोपार्र्जित ढाबा सुरू ठेवून तळेगावमध्ये रॉयल इन्स्टिट्यूट आॅफ स्पोर्टस् नावाची अकादमीही सुरु केली आहे.त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय खेळाडू येतात. काही दिवसांपूर्वी महेंद्रसिंग धोनी व रॉबीन उथप्पाही आले होते. या दोघांसह येणाऱ्या प्रत्येक खेळाडूंनी या ढाब्यावर जेवणाचा आस्वादही घेतला आहे. महेंद्रसिंग धोनी हे सात क्रमांकाची टी-शर्ट घालून खेळत असल्याने या ढाब्याचं नाव ‘आर.एफ-वन’ ऐवजी आता ‘हॉटेल रायसिंग सेव्हन’ केले आहे.

लॉकडाऊनच्या काळामध्ये गावाकडे निघालेल्या वाटसरुंनी अवस्था फार बिकट आहे. त्यांना पोटभर जेवण मिळावे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. सर्व नियमावलींचे पालन करुन दिवसरात्र वाटसरुंना भोजन व नाश्ता दिला जात आहे. आतापर्यंत ३० हजारावर वाटसरुंच्या पोटाला आधार मिळाला आहे. या कार्यात परिवारासह पोलीस निरीक्षक व मित्र मंडळीचे सहकार्य मिळात आहे.
- सोमी भिंडर, ढाबा चालक.

Web Title: Dhaba driver cricketer's six in selfless service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.