डेंग्यूसदृश आजाराचे थैमान
By Admin | Updated: October 15, 2014 23:21 IST2014-10-15T23:21:43+5:302014-10-15T23:21:43+5:30
गत काही दिवसांपासून शहरातील काही भागात डेंग्यूसदृश आजाराचे प्रस्थ वाढले आहे. आता पर्यंत पाच बालकाचा या आजाराने मृत्यू झाला आहे. याची दखल घेत नगर प्रशासनाने तातडीच्या काही

डेंग्यूसदृश आजाराचे थैमान
पुलगाव : गत काही दिवसांपासून शहरातील काही भागात डेंग्यूसदृश आजाराचे प्रस्थ वाढले आहे. आता पर्यंत पाच बालकाचा या आजाराने मृत्यू झाला आहे. याची दखल घेत नगर प्रशासनाने तातडीच्या काही उपाययोजना केल्या; परंतु तेवढ्याने या रोगाचे आक्रमण थांबले नसून आजाराने नव्याने डोके वर काढले आहे.
आजाराचे प्रमाण काढल्याने खासगी व शासकीय रुग्णालयात रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. शहरातील बोहरा गल्लीतील एक व इरिराम नगरातील दोन अशा तीन रुग्णांना वर्धा येथे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
निवडणुकीच्या प्रचार कार्यात मशगूल असणाऱ्या नगरसेवकांना स्वत:च्या प्रभागांतील स्वच्छता व नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याकडे लक्ष पुरविण्यासाठी वेळ नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक भागातील नाल्या स्वच्छ नसल्याची तर साफ झालेल्या नाल्यातील घाण नालीकाठीच पडली असल्याची नागरिकांची ओरड आहे. गांधी चौक धर्मशाळा, फुटाणा लाईनजवळील भाग दीनदयाल चौक हे नित्याचे वर्दळीचे ठिकाण असूनही याकडे नगर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
बोहरा गल्ली, हरिरामनगर येथील साचलेला केर कचरा व हरिराम नगरातून वाहणारा नाला यातील केरकचरा व घाणीमुळे या भागात सध्या डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी बोहरा गल्लीतील समिना मुस्तफा बोहरा (३०) इरिराम नगरातील प्रशांत प्रकाश राठी (३०) व अमीत राठी (३६) या तिघांना डेंग्यूसदृश आजाराची बाधा झाली. त्यांना वर्धा येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. डेंग्यूसदृश आजाराचे प्रस्थ जास्त वाढण्यापूर्वीच स्थानीय प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. परिसरात फॉगिंग मशिनद्वारे फवारणी करण्याची गरज आहे. तसेच आरोग्य व्यवस्थाही रुग्णांना चांगले उपचार देण्यात कमी पडत आहे. परिसराची स्वच्छता न केल्यास रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडण्याची शक्यता व्हक्त होत आहे. परिसरातील रुग्णही येथे उपचार घ्यायला येतात. या कारणामुळेही आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे.(तालुका प्रतिनिधी)