निदर्शने, निवेदन आणि अल्टीमेटम्
By Admin | Updated: August 24, 2014 23:40 IST2014-08-24T23:40:26+5:302014-08-24T23:40:26+5:30
सहा वर्षाच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणात खऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीला घेऊन रविवारी सत्यशोधक महिला प्रबोधिनीसह विविध संघटनातर्फे स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

निदर्शने, निवेदन आणि अल्टीमेटम्
चिमुकलीवरील अत्याचाराचे प्रकरण : चार दिवसानंतर तीव्र आंदोलनाचा इशारा
वर्धा : सहा वर्षाच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणात खऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीला घेऊन रविवारी सत्यशोधक महिला प्रबोधिनीसह विविध संघटनातर्फे स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली.
येत्या चार दिवसात चिमुकलीला न्याय मिळाला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामजिक संघटनांच्या शिष्टमंडळामार्फत पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे. निवेदन सादर करून पोलीस अधीक्षकांशी झालेल्या चर्चेत शिष्टमंडळामार्फत अनेक गंभीर बाबींकडे लक्ष वेधण्यात आले. मुलीच्या वडिलाच्या बयानाचा सखोल तपास करताना पोलीस दिसत नाही. तो ज्यांच्याकडे बोट दाखवत आहे या बाबतही पोलीस गंभीर दिसत नाही. उलट तो काहीही बडबड करतो म्हणून त्याच्या बोलावण्याकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे. मुलीच्या वडिलांचे म्हणणे पोलीस ऐकायला तयार नाही, तर मग मुलगी ज्या वस्तीत राहते त्या वस्तीतील नागरिकांचे म्हणणे तरी पोलिसांनी गांभीर्याने घ्यावे. त्या वस्तीतील नागरिक खऱ्या आरोपींबद्दलची माहिती पोलिसांना देत आहे; मात्र पोलीस त्यांना चूप करण्यात मशगूल झाली असल्यामुळे या प्रकरणाचे रहस्य उलगडण्याऐवजी प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत चालले आहे, याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले. सुमारे अर्धा तास चाललेल्या या चर्चेतून पोलीस अधीक्षक या प्रकरणात त्या चिमुकल्या निर्भयाला न्याय देईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
शिष्टमंडळात सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या प्रा. नुतन माळवी, पद्मा तायडे, श्रेया गोडे, कल्पना तामगाडगे, शालिनी पाटील, जयश्री शाह, प्रा. जनार्दन देवतळे, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, राजू गोरडे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गजेंद्र सुरकार, नरेंद्र कांबळे, प्रजासत्ताक शिक्षक संघाचे अरुण हर्षबोधी, प्रकाश कांबळे, निर्माण फांडेशनचे अमीर अली अजानी, नशाबंदी मंडळाचे मयूर राऊत यांच्यासह मंगेश शेंडे, विनायक तेलरांधे, शेख सलीम, सिद्धार्थ बुटले, किशोर शालिग्राम, राष्ट्रीय सम्बुद्ध महिला संघटनेच्या शारदा झांबरे, गुड्डू अली, गुणवंत डकरे, राजेंद्र कळसाईत, प्रिया पेंदोर, बाबा जाकीर, भीमराव लोहकरे यांचा समावेश होता.
(शहर प्रतिनिधी)