मुंडण करून रेटली ‘फाशी’ची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST2020-02-08T06:00:00+5:302020-02-08T06:00:11+5:30
नंदोरी चौकात घडलेला प्रकार क्रूरतेचा कळस गाठणारा आहे. शिवाय या घटनेमुळे पुन्हा राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारकडून महाराष्ट्रातील महिलांसह जनतेला मोठी आशा आहे. हिंगणघाट येथील घटनेतील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला फाशीची शिक्षा देण्यात यावी.

मुंडण करून रेटली ‘फाशी’ची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील नंदोरी चौक परिसरात एका प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. ही घटना निंदनीयअसून या प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला फाशीच द्या अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत मुंडण आंदोलन करून एकमुखाने रेटली.
नंदोरी चौकात घडलेला प्रकार क्रूरतेचा कळस गाठणारा आहे. शिवाय या घटनेमुळे पुन्हा राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारकडून महाराष्ट्रातील महिलांसह जनतेला मोठी आशा आहे. हिंगणघाट येथील घटनेतील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. शिवाय क्रूर मानसिकतेच्या व्यक्तींना धडा शिकविण्यासाठी तसेच महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी कठोर कायदा तयार करण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याच दरम्यान हिंगणघाट येथील घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी मुंडन केले. ज्येष्ठ नागरिक व निराधार अत्याचार संघर्ष समितीचे विदर्भ प्रदेश अध्यक्षा मंगला ठक यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात युवा साहसिक संघटना व जय जवान जय किसान संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश बोरीकर, दिनेश नगराळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.