स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी
By Admin | Updated: August 16, 2014 23:39 IST2014-08-16T23:39:39+5:302014-08-16T23:39:39+5:30
सारवाडी आणि बांगडापूर परिसरातील गावांत अवैध व्यवसायांनी पुन्हा जोर पकडला आहे़ यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे़ या परिसरातील अवैध व्यवसायांवर नियत्रण ठेवण्यासाठी सारवाडी

स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी
गुन्हेगारीमध्ये झालीय वाढ : सारवाडी व बांगडापूर शिवारात अवैध व्यवसाय
कारंजा (घा.) : सारवाडी आणि बांगडापूर परिसरातील गावांत अवैध व्यवसायांनी पुन्हा जोर पकडला आहे़ यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे़ या परिसरातील अवैध व्यवसायांवर नियत्रण ठेवण्यासाठी सारवाडी आणि बांगडापूर येथे स्वतंत्र पोलीस चौकी देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़
सारवाडी हे गाव महामार्ग क्र. ६ वर असून कारंजापासून १५ किमी अंतरावर आहे. या गावाभोवती घनदाट जंगलाला लागून सुमारे १५ गावे आहेत. देववाडीला पारधी बेडा आहे. उपलब्ध भौगोलिक परिस्थिती व कारंजा पोलीस ठाण्यापासून अंतर लांब पडत असल्याने पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होते़ याचा गैरफायदा घेत परिसरात अवैध दारू निर्मिती, वाहतूक व वाद वाढले आहेत. असामाजिक तत्वांचा जोर वाढला आहे़ अर्थपूर्ण संबंधांमुळे अवैध व्यावसायिकांवर पोलीस नियंत्रण ठेवण्यात असफल ठरली आहे. सारवाडी येथे आठवडी बाजाराच्या दिवशी खुलेआम दारू विकली जाते़ बांगडापूर हे गाव वर्धा रोववरील चौफुलीवरील महत्त्वाचे गाव आहे. चारही बाजुला १० ते १२ गावे आहेत़ ही सर्व गावे घनदाट जंगलात वसलेली आहेत. कमी लागत, अधिक मागणी व अधिक फायदा असलेला अवैध दारू निर्मितीचा, हातभट्टीचा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. हा परिवार कारंजा पोलीस ठाण्यापासून ३० किमीपेक्षा अधिक अंतरावर असल्याने पोलीस यंत्रणेला लक्ष ठेवणे कठीण जाते. एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने या अवैध व्यवसायाबद्दल माहिती दिली तर पोलीस येईपर्यंत व्यवसायांचे साहित्य गायब केले जाते. ज्यांनी माहिती दिली त्यांना या दारू विक्रेत्यांकडून त्रास होतो़ दारू विक्रेत्यांच्या त्रासामुळे व पोलिसांच्या असहकार्यामुळे परिसरातील अनेक दारूबंदी महिला मंडळांनीही आपली कामे बंद केलीत़ यामुळे दारूचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. विशेष म्हणजे अधिक नशा येण्यासाठी या दारूमध्ये अनेक प्रकारच्या विषारी द्रव्याचा वापर केला जातो़
बांगडापूर चौरस्त्यावरून अवैध वाहतूक करणारी अनेक वाहने जातात. अनेकदा सामान्यांची वाहने अडवून लुटमार व चोरीची प्रकरणेही घडली आहेत़ आदिवासींची संस्था अधिक असल्याने भांडणेही होतात. दारू सहज उपलब्ध होत असल्याने याचे प्रमाण वाढले आहे़ वादाचे पर्यवसान मारहाण व हत्येपर्यंत झाल्याची उदाहरणे आहेत़ एकदंरीत, सारवाडी व बांगडापूर परिसरातील अवैध व्यवसाय तसेच असामाजिक तत्वावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही ठिकाणी किमान एक जमादार व चार शिपाई, असणाऱ्या पोलीस चौक्या देणे गरजेचे आहे. जिल्हा पोलीस यंत्रणेने याकडे लक्ष देत पोलीस चौक्या स्थापन कराव्यात, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़(तालुका प्रतिनिधी)