कापसाच्या गंजीत दबून कामगाराचा मृत्यू
By Admin | Updated: January 11, 2016 01:49 IST2016-01-11T01:49:40+5:302016-01-11T01:49:40+5:30
जिनिंगमध्ये काम करीत असलेल्या एका मजुराचा कापसाच्या गंजीत मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना नांदगाव (बो.) येथील जिनिंगमध्ये रविवारी सकाळी उघड झाली.

कापसाच्या गंजीत दबून कामगाराचा मृत्यू
विविध घटनेत तिघांचा मृत्यू : नांदगाव, आकोली व तळेगाव येथील घटना
हिंगणघाट : जिनिंगमध्ये काम करीत असलेल्या एका मजुराचा कापसाच्या गंजीत मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना नांदगाव (बो.) येथील जिनिंगमध्ये रविवारी सकाळी उघड झाली. शंकर दामोधर कुकडे (२७) असे मृतकाचे नाव असल्याचे सांगण्यात आले.
शंकर हा या जिनिंगमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. नित्याप्रमाणे शनिवारी तो कामावर गेला असता रविवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान मृतावस्थेत आढळून आला. याच जिनिंगमध्ये कार्यरत असलेल्या त्याच्या भावाने जिनिंगच्या गाडीने त्याला उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. असे असले तरी शंकर या गंजीवर कसा गेला, त्याच्या अंगावर कापसाचे ढिगारे कसे पडले याचा कुठलाही खुलासा झाला नाही. त्याच्या पार्थिवावर आजच गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, नांदगाव (बो.) येथील जे.आर. जिनिंग येथे शंकर कुकडे हा सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. तो नित्याप्रमाणे शनिवारी रात्री जिनिंगमध्ये कामाला होता. येथे काम सुरू असताना तो कापसाच्या गंजीवर बसला असता तिथेच त्याचा डोळा लागल्याचे जिनिंगच्या परिसरात बोलले जात आहे. गारठा असल्याने त्याने आंगावर कापूस घेतला. काम सुरू असताना तो येथे असल्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने त्याच्या अंगावर कापूस टाकण्यात आला. यातच त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. आज सकाळी जेव्हा या गंजीतील कापूस खाली काढण्यात आला तेव्हा त्याखाली शंकरचा मृतदेह आढळून आला.
या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्रकरणाचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक किशोर डफरे करीत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.(तालुका प्रतिनिधी)
विवाहितेने अंगावर रॉकेल टाकून जाळून घेतले
आकोली : घरी कुणी नसताना अंगावर रॉकेल घेत महिलेने जाळून घेतल्याची घटना नजीकच्या खानापूर (कामठी) येथे शनिवारी रात्री घडली. यात महिला ९५ टक्के जळाली असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सोनू रवींद्र भामकर असे मृतक महिलेचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार, शनिवारी सायंकाळच्या सुमारास सोनू व तिचा पती रवींद्र भामकर हे दोघेही कामावरून घरी आले. त्यानंतर काहीच वेळात शेजाऱ्यांना सदर महिला जळत असल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती खरांगणा पोलिसांना दिली. माहिती मिळताच रुग्णवाहिकेसह खरांगणा ठाणेदार प्रशांत पांडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक वसंत इंगोले, सतीश घवघवे व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठत तिला वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यात रात्री ८ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी तिचा पती घरी नव्हता व त्याचा मोबाईलही बंद असल्याचे सांगण्यात आले. धामणगाव (दत्तापूर) येथील सोनुचा दोन वर्षांपूर्वी रवींद्र भामकर याच्याशी विवाह झाला होता. तिला मुलगा झाला होता. मात्र जन्मानंतर दोन महिन्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.(वार्ताहर)
सर्पदंशाने महिलेचा मृत्यू
तळेगाव (श्यामजीपंत) : देवगाव शिवारात भोसले यांच्या शेतात मजुरीच्या कामाकरिता गेलेल्या महिलेला शेतात काम करीत असताना सर्पदंश झाला. परंतु याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले. तिला वेदना असह्य झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला. सेवाग्राम रुग्णालयात उपचाराकरिता नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. बेबी किसन फसाटे (६०) असे मृतक महिले नाव आहे.
तळेगाव येथील बेबी फसाटे या देवगाव शिवारात भोसले यांच्या शेतात कामाला गेल्या. येथे काम सुरू असताना त्यांना सर्पदंश झाला. याकडे दिवसभर दुर्लक्ष करण्यात आले होते. वेदना असह्य झाल्याने त्यांना प्रथम आर्वी व नंतर सेवाग्राम येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. यातच त्यांचा मृत्यू झाला. कामाच्या शोधात आलेल्या मुजरांपैकी ही एक महिला असल्याचे सांगण्यात येत आहे.(वार्ताहर)