‘त्या’ अपघातातील जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:40 IST2018-01-12T23:40:32+5:302018-01-12T23:40:45+5:30
यशवंत महा.च्या रासेयोचे शिबिरार्थी विद्यार्थी मेटाडोअरमधून केळझर येथे साहित्य घेऊन जाताना गुरूवारी अपघात झाला. यात विशाल केदार वानखेडे याचा मृत्यू झाला होता. गंभीर जखमींपैकी शुभम विनोद झाडे (२२) रा. रेहकी याचा सेवाग्राम रुग्णालयात गुरूवारी रात्री उशीरा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

‘त्या’ अपघातातील जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : यशवंत महा.च्या रासेयोचे शिबिरार्थी विद्यार्थी मेटाडोअरमधून केळझर येथे साहित्य घेऊन जाताना गुरूवारी अपघात झाला. यात विशाल केदार वानखेडे याचा मृत्यू झाला होता. गंभीर जखमींपैकी शुभम विनोद झाडे (२२) रा. रेहकी याचा सेवाग्राम रुग्णालयात गुरूवारी रात्री उशीरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी संतप्त नागरिक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली.
गुरूवारी यशवंत महाविद्यालयाचे विद्यार्थी केळझर येथे आयोजित केलेल्या रासेयो शिबिरासाठी मंडप व स्वयंपाकाचे साहित्य घेऊन मेटाडोअरने जात होते. दरम्यान, कोटंबा थांब्याजवळ विरूद्ध दिशेने येणाºया ट्रकने मेटाडोअरला जबर धडक दिली. या भीषण अपघातात तीन विद्यार्थी, ट्रकचा चालक व क्लिनर जखमी झाले होते तर एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. रात्री उशीरा आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. संतप्त विद्यार्थी व नागरिकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून घोषणाबाजी करीत महाविद्यालय प्रशासनावर रोष व्यक्त केला. शिवाय कारवाईची मागणी करण्यात आली. यावर ठाणेदार निलेश ब्राह्मणे यांनी दोषी चालकावर गुन्हा दाखल केला असून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. विद्यार्थी व नागरिकांची समजूत घालत मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यासाठी घेऊन जाण्याची विनंती केली. महाविद्यालय प्रशासनाने मृतक विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, अशी मागणीही विद्यार्थी व पालकांनी रेटून धरली आहे.