मृगाची चाहुल, शेतकर्‍यांचा जीव टांगणीला

By Admin | Updated: June 2, 2014 01:40 IST2014-06-02T01:40:06+5:302014-06-02T01:40:06+5:30

मृगाची चाहुल लागली. तप्त करणार्‍या उन्हात हलक्या पावसाच्या सरीने

The dead body of the deceased, the survival of the farmers | मृगाची चाहुल, शेतकर्‍यांचा जीव टांगणीला

मृगाची चाहुल, शेतकर्‍यांचा जीव टांगणीला

 

सेलू : मृगाची चाहुल लागली. तप्त करणार्‍या उन्हात हलक्या पावसाच्या सरीने वातावरणात बदल केला. भरपूर पाऊस झाल्याशिवाय उकाडा कमी होणार नाही. शेतकर्‍याला या प्रचंड उकाड्यातही शेतजमिनीवर अखेरचा हात फिरवावा लागत आहे. मशागत करताकरताच त्याला मृग बरसला तर पेरणीची सोय नाही या विवंचनेने त्याच्या जिवाची आता चांगलीच काहिली होत आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बुडाली. सोसायटीचे कर्ज मिळायला नाही. राष्ट्रीयकृत बँक कर्ज देईल परंतु सोसायटीचे कर्ज थकीत आहे. ते दिल्याशिवाय राष्ट्रीयकृत बँक उभे करीत नाही. बियाण्यांचे भाव प्रचंड वाढले आहे. शेतकर्‍यांनी घरचे दाणेदार सोयाबीन नाममात्र भावात विकले. तेच आता दर्जेदार बियाणे म्हणून तिपट्ट किमतीत शेतकर्‍यांना खरेदी करण्याची वेळ आली. कपाशीच्या बियाण्यांचे भावही हात लावू देत नाही. खिशात पैसा नाही. बँकाचे, सोसायटीचे कर्ज थकीत आहे. अशात शेतकर्‍यांना शेती उभी करण्यासाठी मोठ्या दिव्यातून जावे लागत आहे.

लावणीचा हंगाम तोंडावर आला आहे. बी-बियाणे, खते खरेदी करण्याची शेतकर्‍यांची लगबग सुरु आहे. कर्जासाठी बँकेत गर्दी वाढत आहे. मात्र थकबाकीदार कर्जदारांना मृगाची चाहूल अस्वस्थ करीत आहे. या आठवड्यात दणकेदार पाऊस होईल असा शेतकर्‍यांना आशावाद आहे. पाऊस झाला की पेरणीसाठी सज्ज व्हावे लागते; मात्र हातात पैसा नसल्याने काळ्या मातीत बी टाकायचे कसे, या विवंचनेने अनेक शेतकर्‍यांचा आतून गळा घोटला जात आहे.

उन्हातान्हात शेतात राबताना विवंचनेपायी त्यांचे डोके ठिकाणावर नाही. शेतीसाठी कशी तडजोड करायची या प्रयत्नात सावकाराशिवाय पर्याय दिसत नाही. अव्वाच्या सव्वा दराची रक्कम सावकार म्हणेल त्या अटीवर शेतकर्‍यांना घेऊन शेती फुलविण्याची वेळ आली आहे.

अडचणीचा फायदा घेऊन सावकार त्याच्या सोयीने कागदपत्र तयार करतो. प्रसंगी शेताचे विक्रीपत्र करुन घेतो. यासाठी येणारा सर्व खर्च शेतकर्‍याच्या माथी मारुन दरसाल दर शेकडा भाव पक्का करुन तुटपुंजी रक्कम त्याच्या हातावर ठेवली जाते. गरज पडल्यास पुन्हा नेण्याचा सल्लाही दिला जातो. इच्छा नसताना शेतकर्‍यांना हा अवैध करार करण्याची वेळ येते. शासन शेतकर्‍यासाठी कितीही योजना राबवीत असले तरी झारीतील शुक्राचार्य त्या कुडतडून कुडतडून खावून उरलेले तुकडे शेतकर्‍यांपुढे टाकतात. त्यामुळे शासनाच्या विविध योजनेचा शेतकर्‍यांना थेट फायदा होत नाही ही खरी शोकांतिका आहे. गरजवंत शेतकर्‍यासाठी असलेल्या योजना संबंधित अधिकारी ज्या शेतकर्‍यांशी सलोख्याचे संबंध आहे त्यांनाच देतात. कृषी विभागाने वाटप केलेले साहित्य किती गरीब व गरजवंत शेतकर्‍यांना वाटले याचा विचार तालुका कृषी अधिकार्‍यांनी केला पाहिजे, मात्र त्यांच्या हाताखालील कर्मचारीही त्यांच्याच विचाराचे झाल्याने चांगल्या योजनांचा बट्याबोळ सुरु आहे.

गत वर्षी पावसाने झोडपले. यंदातरी निसर्गाने साथ द्यावी. तसेच शासनानेही मदतीचा हात द्यावा अशी आशा शेतकरी लावून बसला असून मरगळ झटकून नव्या हंगामाच्या तयारीला लागला असल्याचे दिसत आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The dead body of the deceased, the survival of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.