कठड्यांविना पूल ठरताहेत धोकादायक

By Admin | Updated: April 23, 2015 01:50 IST2015-04-23T01:50:06+5:302015-04-23T01:50:06+5:30

सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यावतीने रस्ते व पुलांची निर्मिती केली जाते़ ...

Dangerous potholes without rails are dangerous | कठड्यांविना पूल ठरताहेत धोकादायक

कठड्यांविना पूल ठरताहेत धोकादायक


वर्धा : सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यावतीने रस्ते व पुलांची निर्मिती केली जाते़ जिल्ह्यात तीनही शासकीय विभागांमार्फत तयार करण्यात आलेले रस्ते, पूल आहेत; पण बहुतांश पुलांवर कठडेच नाहीत़ यामुळे कठड्यांविना हे पूल धोक्याचे ठरत आहेत़ अपघाताचा धोका टाळण्याकरिता संबंधित विभागांनी आपापल्या पुलांवर कठडे बसवावेत, अशी मागणी सामान्यांतून करण्यात येत आहे़
रहदारी सुलभ व्हावी म्हणून रस्त्यांची निर्मिती होते़ आवागमन प्रभावित होऊ नये म्हणून ठेंगणे पूल काढून उंच पुलांचे बांधकाम केले जाते; पण या पुलांवर कठडे लावण्याकडे कानाडोळा केला जात असल्याचेच दिसते वा क्षतिग्रस्त झालेले कठडे बदलण्याकडे दुर्लक्ष केले जाते़ या प्रकारामुळे ग्रामींणांसह शहरी नागरिकांचीही रहदारी धोक्यात आल्याचे चित्र आहे़ पुलगाव शहरात नागपूर ते औरंगाबाद एक्स्प्रेस वे ची निर्मिती करून उंच पूल बांधण्यात आले़ या पुलांना कठडेही लावण्यात आले; पण वर्धा नदीवर असलेल्या जुन्या पुलाकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले़ सध्या विटाळा, झाडगाव, मंगरूळ, निंबोली, धामणगाव आदी ठिकाणी जाण्याकरिता तसेच देवगाव येथून आर्वीकडे जाणाऱ्या वाहनांद्वारे या पुलाचा वापर होतो़ सदर पुलावर केवळ खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे़ कुठलीही प्रकाश व्यवस्था रात्री नसल्याने सर्व काळोख पसरलेला असतो़ शिवाय या पुलाला कठडे बसविण्यात आलेले नाहीत़ ठेंगणा असलेला हा पूल जुना आहे़ सध्या मुख्य वाहतूक या पुलावरून होत नसली तरी बहुतांश ग्रामस्थांना याच पुलाचा वापर करावा लागतो़
असाच प्रकार आर्वी ते अंजनगाव (सुर्जी) मार्गावर पाहावयास मिळतो़ या मार्गावर वर्धा नदीवर पुलांचे बांधकाम करण्यात आलेले आहे; पण एकाही ठिकाणी पुलाला कठडे बसविण्यात आलेले नाहीत़ नव्याने बांधलेले पुलही कठड्यांविनाच ठेवल्याने एकूण बांधकामावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते़ आर्वी येथून अमरावती जिल्ह्यात जाण्याकरिता हा जवळचा मार्ग आहे़ शिवाय या मार्गावर टाकरखेडे, जऊरवाडा, जगागिरपूर ही देवस्थाने आहेत़ यामुळे भाविकांची नेहमी वर्दळ असते़ या मार्गावरील पुलांना कठडे लावणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेच दिसते़ पवनार या वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या गावातही हा प्रकार प्रकर्षाने जाणवतो़ नागपूर ते वर्धा या राज्य मार्गावर असलेल्या पवनार येथे धाम नदीवर उंच पुलाची निर्मिती करण्यात आली़ या पुलाला कठडे लावण्यात आले; पण जुन्या ठेंगण्या पुलावरील कठडे काढून घेण्यात आले़ वास्तविक, आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम, नदीवर जाताना जुन्या पुलाचा वापर केला जातो़ लहान पुलावरून अनेक वाहनेही ये-जा करतात़ यामुळे या पुलावर कठडे असणे गरजेचे आहे; पण याकडे दुर्लक्ष केले जात आहे़
यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुलांवर कठडे बसविण्यात आलेले नाहीत़ संबंधित विभागांनी याकडे लक्ष देत नागरिकांची वाहतूक सुरक्षित करण्यासाठी पुलांना कठडे लावणे गरजेचे आहे़(कार्यालय प्रतिनिधी)

ग्रामीण भागात होते केवळ पुलांची निर्मिती; कठड्यांचा पडतोय विसर
गत २०१३-१४ च्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील अनेक ठेंगणे असलेले पूल वाहून गेलेत़ अनेक रपट्यांची वाताहत झाली़ यानंतर जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागांनी आपापल्या हद्दीतील पुलांचे बांधकाम केले़ यात बहुतांश पुलांना कठडेच लावण्यात आलेले नसल्याचे समोर आले आहे़ शिवाय जुन्या कठडे नसलेल्या पुलांकडेही दुर्लक्षच करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे़ यामुळे ग्रामीण भागातील रहदारी धोक्यात आली आहे़
कठडे नसलेल्या पुलांवरून वाहनांना ये-जा करताना धोका निर्माण झाला आहे़ अनेकदा या पुलांवरून वाहने कोसळून अपघात झाले आहेत़ या अपघातानंतरही प्रशासनाला जाग येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ संबंधित विभागांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़

Web Title: Dangerous potholes without rails are dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.