टाईल्स विके्रत्याला ग्राहक न्यायालयाचा दणका
By Admin | Updated: July 27, 2014 23:54 IST2014-07-27T23:54:37+5:302014-07-27T23:54:37+5:30
घराकरिता टाईल्स खरेदी करताना ग्राहकाकडून एमआरपीपेक्षा जास्त किंमत वसूल करणाऱ्या विके्रत्यास ग्राहक न्यायालयाने प्राप्त तक्रारीवरून आर्थिक दंड ठोठावला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास

टाईल्स विके्रत्याला ग्राहक न्यायालयाचा दणका
वर्धा : घराकरिता टाईल्स खरेदी करताना ग्राहकाकडून एमआरपीपेक्षा जास्त किंमत वसूल करणाऱ्या विके्रत्यास ग्राहक न्यायालयाने प्राप्त तक्रारीवरून आर्थिक दंड ठोठावला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास विके्रत्याकडून टाळाटाळ करण्यात आल्यास दंडाची रक्कम व्याजदराने देण्याचे आदेशात नमुद आहे. शारीरिक व मानसिक त्रासापोटी तक्रारीकरिता आलेल्या खर्चाची रक्कम परत करण्याचाही आदेश विक्रेत्यास दिला आहे. गणेश लाडेकर यांच्या तक्रारीवरून विक्रेता पंकज नरेडी यांच्या विरुद्ध हा आदेश पारित केला आहे.
माहितीनुसार, देवळी येथील गणेश लाडेकर यांनी शक्ती टाईल्स, कारला रोड, वर्धा येथून टाईल्सची खरेदी केली होती. यावेळी टाईल्सच्या पेटीवर दिलेल्या छापील एमआरपीपेक्षा विक्रेत्याने १४ हजार ४९७ रुपये अधिक घेतल्याचे लाडेकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी खरेदी केलेल्या विविध पेट्यापैकी एमआरपीपेक्षा सहा हजार, ९ हजार ७६० आणि १ हजार ९१७ अशा तीन वेगवेगळ्या आकारातील टाईल्स पेटीवर पैसे अधिक घेतले. यानंतर लाडेकर यांनी दुकानात जावून याबाबत तक्रार केली असता. विक्रेत्याने जादा पैसे आकारण्याची बाब स्पष्टपणे नाकारली. आपल्या विनंतीस विक्रेत्याकडून धुडकावून देण्यात येत असल्याचा प्रकार लक्षात येताच त्यांनी न्यायाकरिता ग्राहक तक्रार निवारण मंच येथे विक्रेत्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर ग्राहक न्यायालयाने गैरअर्जदार पंकज नरेडी यांना न्यायालयात सुनावणीस उपस्थित राहण्याचे पत्र पाठविले. मात्र त्यांनी ही तक्रार स्वीकारली नाही. म्हणून ‘नो क्लेम’ या पोस्टाच्या शेऱ्यासह नोटीस परत आली. यानंतर पाठविलेल्या नोटीसलाही गैरअर्जदाराने कोणताच प्रतिसाद दिला नाही. अखेर ग्राहक न्यायालयाने हे प्रकरण एकतर्फी चालविण्याचा निर्णय घेत तसा आदेश पारित केला. यावर सुनावणी करून लाडेकर यांना न्याय देवून दिलासा दिला आहे.
यावेळी मंचाचे प्रभारी अध्यक्ष मिलिंद केदार, सदस्य स्मिता चांदेकर यांनी न्यायदान प्रक्रिया पार पाडली.(स्थानिक प्रतिनिधी)