‘क्लीन अप वर्धाला’ अस्वच्छतेचा शाप
By Admin | Updated: February 9, 2015 23:17 IST2015-02-09T23:17:16+5:302015-02-09T23:17:16+5:30
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनला ‘ओ’ देत वर्धा शहरातही प्रशासनाने ‘क्लीन अंप’ नावाखाली ‘स्वच्छ वर्धा अभियान’ सुरू केले़ प्रजासत्ताक दिन व त्यानंतर महात्मा गांधी यांच्या ३० जानेवारी

‘क्लीन अप वर्धाला’ अस्वच्छतेचा शाप
स्वच्छ सुंदर वर्धा अभियानाचा बोजवारा : फोटोपुरती ठरली मोहीम; शहराच्या गल्लीबोळात कचरा
वर्धा : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनला ‘ओ’ देत वर्धा शहरातही प्रशासनाने ‘क्लीन अंप’ नावाखाली ‘स्वच्छ वर्धा अभियान’ सुरू केले़ प्रजासत्ताक दिन व त्यानंतर महात्मा गांधी यांच्या ३० जानेवारी या स्मृतिदिनी वर्धा शहरात स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली; पण त्यानंतर स्वच्छ वर्धा अभियानाचा बोजवाराच उडालेला दिसतो़ शहरातील कचऱ्याचे ढोले भरलेले, रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगार, नाल्या तुंबलेल्या ही स्थिती अभियानाच्या १२ दिवसानंतरही कायम दिसून आली़ यावरून स्वच्छ वर्धा अभियान केवळ फोटो काढण्यापूरतेच तर मर्यादित नव्हते ना, असा संशय व्यक्त होत आहे़
जिल्हा प्रशासनाद्वारे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रजासत्ताक दिनापासून स्वच्छ वर्धा अभियानास प्रारंभ करण्यात आला़ मान्यवरांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करून हातात खराटे घेऊन कचऱ्यावर उभे राहुन फोटो काढण्याचे सोपस्कारही पार पाडण्यात आले़ यानंतर ३० जानेवारी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी या अभियानाचा जोर शहरात पाहावयास मिळाला़ २६ जानेवारीपासून सुरू झालेल्या स्वच्छ वर्धा अभियानाचे सातत्य कायम राहिल, अशी जनतेला अपेक्षा होती; पण ती १२ दिवसांतच फोल ठरली़ ‘क्लीन अप’ असे फलक हाती घेऊन स्वच्छ वर्धा अभियान सुरू करण्यात आले़ या अभियानासाठी अन्य ठिकाणीही फलक रोवण्यात आलेत; पण किती स्वच्छता केली, हा संशोधनाचा विषय ठरत आहे़
शहरातील बजाज चौक ते रेल्वे स्टेशन मार्गावर रोटरी क्लब, युवा शक्ती व अन्य विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवून नाल्या साफ केल्या होत्या़ या स्वच्छ केलेल्या नाल्या पुन्हा तुंबल्या आहेत़ भाजी बाजार परिसरात नालीच्या काठावर ‘क्लीन अप’ हा फलकही लावण्यात आला; पण सध्या त्या फलकाजवळच कचरा व घाणीचे साम्राज्य आहे़ ती नाली सांडपाण्याने तुंंबली असून परिसरात दुर्गंधीही पसरली आहे़ असाच प्रकार बाजार ओळींतही पाहावयास मिळतो़ कचऱ्याचे ढोले आहेत़ ढोल्यात कमी तर त्याच्या अवतीभवतीच अधिक कचरा दिसून येतो़ ढोल्यामध्ये कचरा जाळला जात असल्याने तेही निकामी होत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले़ हा प्रकार केवळ शहरातच दिसतो, असे नव्हे तर प्रशासकीय कार्यालये असलेल्या परिसरातही स्वच्छ वर्धा अभियानानंतर फारशी स्वच्छता दिसत नाही, हे वास्तव आहे़ प्रशासकीय अधिकारी, मान्यवरांच्या साक्षीने सुरू झालेल्या या अभियानाचा बारा दिवसांतच बोजवारा उडाल्याचे यावरून दिसते़ उद्घाटनापूरतेच अभियान राबविले जात असल्याच्या प्रतिक्रीया सामान्यांतून उमटत आहेत़ कुठे रस्त्याच्या कडेला तर कुठे भिंतीच्या शेजारी कचऱ्याचे ढिगारे आहेत़ यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून सार्वजनिक आरोग्यही धोक्यात आले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)