३० हजार ५०० हेक्टरमध्ये होणार कपाशीची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 05:00 IST2021-06-06T05:00:00+5:302021-06-06T05:00:11+5:30
चालू आठवड्यात देवळी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने रविवारी सायंकाळी तर गुरुवारी दोन दिवस जोरदार हजेरी लावली. रोहिणी नक्षत्रात बरसलेल्या पूर्व मौसमी पावसाने बळीराजा सुखावल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी शिवारात लगबग वाढली आहे. ऊन-सावल्यांच्या खेळात आभाळाच्या छताखाली बळीराजा दिवस उजाडल्यापासून मावळेपर्यंत घाम गाळताना दिसत आहे.

३० हजार ५०० हेक्टरमध्ये होणार कपाशीची लागवड
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : रोहिणी नक्षत्राच्या पावसानंतर शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. अनेक संकटांची टांगती तलवार डोक्यावर घेऊन शेतकरी पुन्हा नव्या जोमाने तयारीला लागला आहे. देवळी तालुक्यात सुमारे ५८ हजार ३० हेक्टर खरिपाचे लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी या हंगामात ३० हजार ५०० हेक्टरमधे कापूस लागवड केली जाणार आहे. तर १८ हजार २५० हेक्टर सोयाबीन आणि ९ हजार २५० हेक्टरमध्ये तूर लागवड तर उर्वरित क्षेत्रात इतर पीक लागवडीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
चालू आठवड्यात देवळी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने रविवारी सायंकाळी तर गुरुवारी दोन दिवस जोरदार हजेरी लावली. रोहिणी नक्षत्रात बरसलेल्या पूर्व मौसमी पावसाने बळीराजा सुखावल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी शिवारात लगबग वाढली आहे. ऊन-सावल्यांच्या खेळात आभाळाच्या छताखाली बळीराजा दिवस उजाडल्यापासून मावळेपर्यंत घाम गाळताना दिसत आहे.
मृग नक्षत्र आणि शेतकरी हे खरीप हंगामाचे समीकरण बनले आहे. मृगापासून खरीप हंगामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. येणाऱ्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र ठरते. परंतु, गेल्या काही वर्षापासून कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडतोच. त्याचबरोबर अवकाळीचे अरिष्ट आणि सरकारची वक्रदृष्टी शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे. दरवर्षी येणारा हंगाम शेतकऱ्यांची उमेद जागवतो खरी, परंतु त्याचबरोबर अनेक प्रश्नांची मालिका सोबत घेऊन येतो. शेतकऱ्यांमागचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नाही. कोरोनाने तर दीड वर्ष झाली बळीराजाला जगणे कठीण करून ठेवले आहे.
शेतात पिकले तरी बाजारपेठेची चिंता काही पाठ सोडत नाही. मागील वर्षी सोयाबीन पीक अतिवृष्टीने नेस्तनाबूत केले. कपाशीला बोंडसड व बोंडअळीने खाल्ले. तर लाॅकडाऊनमुळे आता अनेकांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर घातले, नांगर चालविला. दरम्यान आर्थिक कोंडीत सापडलेला बळीराजा विविध संकटांची टांगती तलवार डोक्यावर घेऊन यंदा चांगला पाऊस होईल आणि उत्पादन भरभरून येईल या आशेने खरिपाच्या तयारीला लागले असून पेरणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकावर विविध रोगांचे आक्रमण झाले होते. परिणामी, तालुक्यातील सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट आली. यंदाच्या खरीप हंगामात कपाशीच्या लागवड क्षेत्रात काही प्रमाणात वाढ होईल तर सोयाबीन क्षेत्रात घट येण्याची शक्यता आहे. तर तुरीच्या क्षेत्रात वाढ निश्चित आहे.
- अश्विनी कुंभार, तालुका कृषी अधिकारी देवळी.