कापसाला योग्य हमीभाव मिळावा
By Admin | Updated: November 11, 2014 22:46 IST2014-11-11T22:46:18+5:302014-11-11T22:46:18+5:30
जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने दिली. पण आता त्याला हरताळ फासू लागले आहेत. केंद्र सरकारने कापसाला फक्त चार हजार पन्नास हमी भाव जाहीर केला आहे.

कापसाला योग्य हमीभाव मिळावा
वर्धा : जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने दिली. पण आता त्याला हरताळ फासू लागले आहेत. केंद्र सरकारने कापसाला फक्त चार हजार पन्नास हमी भाव जाहीर केला आहे. तो हमी भाव मिळावा म्हणून शासन हमी भावाने पणन व नाफेडच्या मार्फत कापूस खरेदी करत असे. परंतु नव्या सरकारने महाराष्ट्र शासन नाफेड कडून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणार नसल्याने जाहीर केले आहे. त्यामुळे कापसाला सहा हजार हमी भाव जाहीर करावा व शासनाची हमी केंद्रे तत्काळ सुरू करावी अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात मोदी सरकार आणा, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्च व त्यावर पन्नास टक्के जास्त नफा देवून शेती मालाला भाव देऊ, असे जाहीर सांगितले होते. पण आता राज्यात आणि केंद्रातही भाजपचे सरकार असतानाही शेतकऱ्यांच्या कापसाला सहा हजार भाव का दिल्या जात नाही. निवडणुकी पूर्वी दिलेली आश्वासने ही शेतकऱ्यांची फसवणूक करणारी होती व शेतकऱ्यांचे या नेत्यांचे या पूर्वीचे शेतकरी प्रेम बेगडी होते का असा सवाल या निवेदनातून करण्यात आलेला आहे.
शेतकरी आज दुष्काळाच्या फेऱ्यात अडकला आहे. शेतीसाठी वीज मिळत नाही. त्यावर कोणी बोलत नाही. हमी भावापेक्षाही कमी तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशेच्या दरम्यान खाजगी व्यापारी कापूस खरेदी करत आहे. हमी भाव टिकावा म्हणून या पूर्वी शासन खाजगी व्यापाऱ्यांच्या जोडीने पणन व नाफेडच्या मार्फत कापूस खरेदी करत होती. पण या नव्या सरकारने मात्र शेतकऱ्यांचा कापूस हमी भावात पणन किंवा नाफेडच्या मार्फत खरेदी केल्या जाणार नाही, असे धोरण जाहीर करून शेतकऱ्यांना चांगलेच तोंडधशी पाडले आहे. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या हवाली करून, त्यांना मनमानी करण्यासाठी रान मोकळे केलेले आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून विदर्भात अशामुळे शेतकरी आत्महत्या सत्र पुन्हा नव्याने सुरू झाल्याचे दिसते. असे असतानाही दरवर्षी कापसाला सहा हजार रूपयांसाठी हमखास आंदोलन करणारे भाजपाचे नेते मात्र कुठे दिसत नाही. आता शेतकऱ्यांनीच आपल्या न्याय्य अधिकारासाठी कापूस भाव आंदोलनात उतरावे, असे आवाहन करण्यात आले. शेतकऱ्यांना सोबत घेऊन, भाजप नेत्यांच्या, आमदार, खासदार मंत्र्यांच्या घरासमोर बँडबाजा वाजवून या अन्यायाचा विरोध करेल असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांना जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्यामार्फत पाठविलेल्या निवेदनातून संघटनेच्या वतीने करण्यात आला.
यावेळी शिष्टमंडळात समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर देशमुख, जिल्हा संघटक विनय डहाके, अनिरूद्ध गवई, संजय मस्के, सुधीर पांगुळ, मनोहर गायकवाड, संदीप किटे, निळकंठ राऊत, नामदेव गुजरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)