कवडीमोल भावात कापसाची खरेदी
By Admin | Updated: January 29, 2015 23:12 IST2015-01-29T23:12:26+5:302015-01-29T23:12:26+5:30
शासनाने जाहीर केलेल्या कापसाच्या हमीभावापेक्षा कमी दराने खासगी व्यापारी जिनिंगमार्फत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून लूट करीत आहे़ या प्रकरणी कापूस उत्पादक शेतकरी संघाने

कवडीमोल भावात कापसाची खरेदी
केळझर : शासनाने जाहीर केलेल्या कापसाच्या हमीभावापेक्षा कमी दराने खासगी व्यापारी जिनिंगमार्फत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून लूट करीत आहे़ या प्रकरणी कापूस उत्पादक शेतकरी संघाने जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांची भेट घेत याकडे लक्ष वेधले़
येथील शेतकरी मिलिंद हिवलेकर यांच्यासह कापूस उत्पादक शेतकरी संघाच्या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या दयनीय परिस्थितीचा फायदा खासगी व्यापारी घेत असल्याचे सांगितले़ यंदा नैसर्गिक वातावरण अनुकूल नसल्याने कपाशीच्या उत्पन्नात घट झाली़ यामुळे शेतीचा खर्चही निघणे शक्य नाही. शासनाने कपाशीला जाहीर केलेला हमीभाव ४०५० रुपये प्रती क्विंटल असताना खासगी जिनिंगद्वारे आपल्या मर्जीप्रमाणे दरकपात करून ३७०० ते ३८०० रुपये क्विंटल इतक्या कमी भावात शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करीत आहे.
कापूस नेल्यानंतर प्रारंभी अधिक भावाने बोली करतात व कापूस खाली केल्यानंतर अत्यल्प भाव दिले जातात़ यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना व्यापारी मागेल त्या भावाने कापूस विकावा लागतो. सीसीआयने हमीभावात कापूस खरेदी सुरू केली खरी; पण नियमित खरेदी होताना दिसत नाही. अधिकारी मनमर्जी कापूस खरेदी करतात व कधीही खरेदी बंदचा फलक लावतात़ यामुळे तेथे कापूस घेऊन गेलेला शेतकरी रित्या हाताने परत येतो. हा प्रकार अत्यंत क्लेषदायक व अन्यायकारक ठरत आहे़ सीसीआयने किमान आवठ्यातून सहा दिवस तरी शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़
गावातील खत विक्रेते कपाशीला लागणाऱ्या युरिया व अन्य खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना जादा दराने विक्री करतात. यामुळे सर्वत्र शेतकऱ्यांना नागविले जात असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला़
शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या या समस्यांकडे जिल्हाधिकारी सोना यांचे लक्ष वेधून यावर त्वरित उपाययोजना करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी कापूस उत्पादक शेतकरी संघाने निवेदनातून केली आहे. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)