लाल्यामुळे कपाशीचे उत्पादनही घटणार!

By Admin | Updated: November 20, 2014 22:57 IST2014-11-20T22:57:38+5:302014-11-20T22:57:38+5:30

यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटणाराच ठरत आहे़ उशीरा झालेल्या पेरणीमुळे सोयाबीन पिकाचा उतारा अत्यल्प आला़ आता लाल्याच्या आक्रमणामुळे कपाशीचे पिकही धोक्यात आले आहे़

Cotton production will also fall! | लाल्यामुळे कपाशीचे उत्पादनही घटणार!

लाल्यामुळे कपाशीचे उत्पादनही घटणार!

समुद्रपूर : यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटणाराच ठरत आहे़ उशीरा झालेल्या पेरणीमुळे सोयाबीन पिकाचा उतारा अत्यल्प आला़ आता लाल्याच्या आक्रमणामुळे कपाशीचे पिकही धोक्यात आले आहे़ सोयाबीन नाही व आता कपाशीचे उत्पादनही कमी होणार असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे़
सध्या कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केले आहे़ यामुळे कपाशीचा उतारा २ ते ३ क्विंटलवर आला आहे़ एक एकर कापसाला लागणारा किमान खर्च नांगरणी १००० रुपये, फन्नाट ५०० रुपये, बियाणे १८६० रुपये, खते ५५२० व इतर ४ हजार ६६० असा एकूण खर्च दर एकरी १३ हजार २४० रुपये येतो़ एकरी ३ क्विंटल कापूस झाल्यानंतर शेतकऱ्यांना चार हजार रुपये क्विंटल भावाने तो विकावा लागतो़ यात शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळतात़ शेतकऱ्यांना कपाशीमध्येही १२४० रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचे दिसते़ या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडत आहे़ सोयाबीनबाबतही हाच प्रकार घडत आहे़ एका एकराला लावडीकरिता नांगरणी १००० रुपये, फवारणी ५०० रुपये, बियाणे १९०० रुपये, खते १००० रुपये, फवारणी १२०० रुपये, सवंगणी १००० रुपये, काढणी खर्च ४०० रुपये असा एकूण सोयाबीनचा खर्च सात हजार रुपये येतो़ एकरी सोयाबीनचे उत्पादन २ क्विंटल होत आहे़ हे सोयाबीन शेतकऱ्यांना ३ हजार रुपये दराने विकून केवळ ६ हजार रुपये प्राप्त होत आहेत़ यामुळे यातही एक हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे़ अन्य पिकांची स्थितीही अशीच आहे़ यामुळे शेती करावी की नको, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत़ अशा स्थितीत शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Cotton production will also fall!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.