कोरोनामुळे डोळे उघडले; कोविड रुग्णालये वाढली, सुविधाही वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 05:00 IST2021-07-01T05:00:00+5:302021-07-01T05:00:02+5:30
कोविडची दुसरी लाट उच्चांकी गाठत असताना तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून जिल्ह्यातील ११ शासकीय रुग्णालयांत वायू ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात आले; पण आतापर्यंत केवळ वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय या एकाच शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभा झाला आहे; तर विदर्भासाठी उपयुक्त ठरणाऱ्या, वर्धा शहराशेजारील जम्बो कोविड हॉस्पिटलचा विषय सध्या धूळ खात आहे.

कोरोनामुळे डोळे उघडले; कोविड रुग्णालये वाढली, सुविधाही वाढल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविडच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट ही प्रभारी राहिली. सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची संख्या रोडावली असली तरी कोविडची दुसरी लाट उच्चांकी गाठत असताना ‘आरोग्य’सह जिल्हा प्रशासनाचे डोळे उघडले. शिवाय जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांची संख्या दोनवरून दहा इतकी झाल्याने कोविडबाधितांना उपचारांसाठी सुविधा मिळाली. असे असले तरी कोविडची दुसरी लाट उच्चांकी गाठत असताना तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून जिल्ह्यातील ११ शासकीय रुग्णालयांत वायू ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात आले; पण आतापर्यंत केवळ वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय या एकाच शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभा झाला आहे; तर विदर्भासाठी उपयुक्त ठरणाऱ्या, वर्धा शहराशेजारील जम्बो कोविड हॉस्पिटलचा विषय सध्या धूळ खात आहे. मध्यंतरी जिल्हा शल्यचिकित्सक तसेच जिल्हा आरोग्याधिकारी यांना काही रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. या सध्याच्या कोरोना संकटकाळात रुग्णसेवा देण्यासाठी उपयुक्तच ठरत आहेत.
ग्रामीण भागातही वाढ
वर्धा शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून शहराशेजारी सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथे वैद्यकीय महाविद्यालय आहे. ते कोरोना संकटात कोविड मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्तच ठरत आहे. असे असले तरी कोविडची दुसरी लाट उच्चांक गाठत असताना हिंगणघाट, आर्वी, समुद्रपूर तालुक्यांतील जाम येथे काही खासगी रुग्णालयांना कोविडबाधितांवर उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालये आणि आठ ग्रामीण रुग्णालयांत या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये योग्य रेफर पद्धत कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे गंभीर कोविड बाधितांना योग्य वेळी चांगली आरोग्य सुविधा मिळाली.
कोविडमध्ये सेवाग्राम, सावंगीचे रुग्णालय ठरले उपयुक्त
- कोविड विषाणू जिल्ह्यात मृत्यू तांडव करीत असल्याचे लक्षात येताच जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांच्या संख्येत वाढ करीत ऑक्सिजन बेडची संख्या सेवाग्राम तसेच सावंगी येथील रुग्णालयासह ग्रामीण भागातील रुग्णालयात करण्यात आली. असे असले तरी आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था केवळ सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात होती तशीच सध्या आहे. एकूणच अतिगंभीर कोविडबाधितांवर उपचार करण्यासाठी ही दोन रुग्णालये उपयुक्तच ठरत आहेत. कोविडची तिसरी लाट गृहित धरून सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालय वगळता इतर ठिकाणी आयसीयू आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था कशी होईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
कोविडची दुसरी लाट उच्चांकी गाठत असताना प्रत्येक कोविडबाधिताला चांगली आरोग्य सेवा कशी मिळेल यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न झाले. तर तिसरी लाट गृहीत धरून काही उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती मंदावली असली तरी कोविडचे संकट कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
अर्चना मोरे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा.