लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मागील वर्षीपासून कोरोनाचे संकट असताना, याहीवेळी मार्च महिन्यापासून कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे थंड पाण्यासोबत शीतपेयांना मागणी कमी झाली आहे. परिणामी, थंड पाण्याच्या जारची विक्री मंदावली आहे.वर्धा जिल्ह्यात १७० च्या जवळपास जारच्या माध्यमातून थंड पाण्याची विक्री करणारे, तर केवळ शहरात ७२ प्रकल्प आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात जारच्या माध्यमातून विक्री होणाऱ्या पाण्याची मागणी प्रचंड वाढते. यातून मोठी उलाढाल होते. मात्र, मागील वर्षीपासून जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. तो अद्याप कायम आहे. जारद्वारे पाणीविक्री प्रकल्पासाठी जिल्ह्यातील व्यावसायिकांनी मोठी गुंतवणूक केली. मात्र, थंड पाण्याचा हा व्यवसाय मागील वर्षीपासून पुरता थंडावला आहे. या व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. संचारबंदीमुळे एकीकडे बाजारपेठ ठप्प आहे. मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने लग्नसराईचे असतात. मात्र, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे विवाह सोहळेदेखील आटोपशीर होत आहेत. त्यामुळे थंड पाण्याची मागणी प्रचंड घटली आहे. सद्यस्थितीत व्यावसायिकांकडून कोविड सेंटर आणि मर्यादित संख्येत होत असलेल्या सोहळ्यांकरिता थंड पाणी पुरविले जात आहे. मात्र, मागणी अल्प आहे. कोरोनामुळे थंड पाणी नकोच, असा सूर नागरिकांकडून आळविला जात आहे. २०१९ मध्ये ८ ते १० हजार रुपयांच्या थंड पाण्याच्या जारची विक्री होती. त्यात प्रचंड घट होऊन दररोज आता केवळ १००० ते १२०० रुपयांची विक्री होत असल्याचे व्यावसायिकाने सांगितले.
नगरपालिकेकडे १५ व्यावसायिकांचे शपथपत्र
जिल्हाभरात १७० च्या जवळपास जारच्या माध्यमातून थंड पाण्याचे प्रकल्प असून, शहरात ७२ प्रकल्प आहेत. लूज वॉटर असल्या कारणाने या प्रकल्पांना परवानगीची गरज नाही, असा व्यावसायिकांत मतप्रवाह आहे. मध्यंतरीच्या काळात प्रशासनाने हे प्रकल्प अवैध ठरवत देवळी आणि वर्धा शहरात प्रकल्पांवर टाळेबंदीची कारवाई केली होती. यावेळी वर्धा शहरातील १५ व्यावसायिकांकडून नगरपालिकेने शपथपत्र लिहून घेतले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आहे. त्यामुळे व्यवसाय ठप्प असल्याने पाणी जार मागविले जात नाहीत. दुसरीकडे कोरोना संसर्गाची भीती आहेच, थंड पाण्यामुळे घशात इन्फेक्शन होत असल्याने सध्या जारमधील थंड पाणी पिणे प्रकर्षाने टाळत आहे.- पंकज धांदे, व्यावसायिक, वर्धा.
वर्धा शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आर. ओ.प्लांट आहेत. उन्हाळ्यात थंड पाण्याच्या जारला दरवर्षी मोठी मागणी असते. मात्र, कोरोनामुळे ती मंदावली आहे. या व्यवसायाला शासनाकडून अद्याप रितसर परवानगी नाही. मध्यंतरी प्रशासनाने पाणी प्रकल्प अवैध ठरवून कारवाई केली होती. याकरिता राज्यस्तरावर संघटना स्थापना करून शासनाविरुद्ध येत्या काळात लढा उभारला जाणार आहे. या व्यवसायाला कायमस्वरूपी परवानगी देण्याची गरज आहे.- अभिषेक उराडे, महाराष्ट्र जलसेवा युनियन, वर्धा
कोरोना विषाणू संसर्गाचा काळ असल्याने थंड पाणी पिणे टाळावे, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. शिवाय तशा प्रकारच्या चर्चादेखील होत आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांकडून जारमधील थंड पाणी पिणे टाळले जात आहे. तसेच लग्नसोहळ्यांवर बंधने आली आहेत.- राहुल ढोके, वर्धा.