सामूहिक वनहक्क प्राप्त १६५ गावांचे अधिवेशन
By Admin | Updated: June 20, 2016 01:51 IST2016-06-20T01:51:08+5:302016-06-20T01:51:08+5:30
नई तालीम समितीच्या शांती भवनात सामूहिक वनहक्क प्राप्त विदर्भातील १४५ व कोकणातील २० गावांचे दोन दिवसीय ....

सामूहिक वनहक्क प्राप्त १६५ गावांचे अधिवेशन
नई तालीम समितीत कार्यक्रम : वनहक्क समिती व एनजीओंना येणाऱ्या समस्या व आराखड्यावर चर्चा
सेवाग्राम : नई तालीम समितीच्या शांती भवनात सामूहिक वनहक्क प्राप्त विदर्भातील १४५ व कोकणातील २० गावांचे दोन दिवसीय प्रथम वार्षिक अधिवेशन पार पडले. याप्रसंगी राज्य आदिवासी विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, युएनडीपी दिल्लीचे सुनील चौधरी, अमरावतीचे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, नागपूर अतिरिक्त आदिवासी आयुक्त माधवी खोडे, गोंदियाचे उपवन संरक्षक जितेंद्र रामगावकर, कार्यकारी संचालक दिलीप गोडे, खोज संस्थेच्या पौर्णिमा उपाध्याय आदी उपस्थित होते.
चौधरी यांनी गावस्तरावर ग्रामसभेद्वारे वनहक्काचे कार्य सुरू आहे. सामूहिक वन हक्काचे कार्य राज्यात यशस्वीरित्या सुरू आहे. अन्य राज्यांनी महाराष्ट्राचा आदर्श घेऊन कार्य करावे. गावातील समिती व एनजीओ यांनी मिळून कामात सुसंगतता आणावी. प्रशिक्षणाची व्यवस्था करावी, असे सांगितले. खोडे यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात कार्यरत कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळा घ्यावी. एनजीओ व समिती यांचा थेट संबंध व संवाद नागरिकांशी असल्याने समस्या व अडचणींची जाणीव असते. याची सोडवणूक अधिकाऱ्यांमार्फत करावी. वन संरक्षण व उत्पादनाचा विचार करता सण वेगळ्या पद्धतीने साजरे करण्याची नवीन परंपरा निर्माणाचे काम गावांत व्हावे, असे सांगितले. देवरा यांनी वन हक्काबाबत जागृती निर्माण झाली. येथे चर्चा, आढावा, विकास कार्य व आराखडा यावर मते मांडली. नागरिकांत प्रत्यक्ष कार्य समिती, एनजीओ करते. शासनाचा तो दुवा आहे. वन, आदिवासी व ग्रामीण विकास विभाग ठोस निर्णय घेऊन मदत करेल, असे सांगितले.
सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती व हक्क अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी, धोरणात्मक बदल, आराखडे ३ वर चर्चा करण्यात आली. गडचिरोली, अमरावती, नागपूर, गोंदिया, यवतमाळ येथील उपजीविका मंचने समस्या व उपायांवर सादरीकरण केले. वनहक्क कायद्याखालील ग्राम संरक्षण गौण उपज गोळा करणाऱ्या देवरी तालुक्यातील नऊ गावांतील गट ग्रामसभा स्थापन करून तेंदूपत्ता कामगार, मजुरांना धनादेश देण्यात आले. प्रास्ताविक उपाध्याय यांनी केले. संचालन डॉ. मोघे यांनी केले तर आभार मृणालीनी यांनी मानले. गोंदिया, अमरावती, गडचिरोली, यवतमाळ, रायगड व ठाणे जिल्ह्यातील १४५ गावांतील प्रतिनिधी सहभागी झाले. वासुदेव कुडमते, गोविंद पिसे, महादेव गिल्लुरकर, गौतम नितनवरे आदींनी सहकार्य केले.(वार्ताहर)