पावसाची संततधार; जलाशयांच्या पातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 05:00 IST2021-07-23T05:00:00+5:302021-07-23T05:00:34+5:30
जिल्ह्यात सर्वदूर सुरु असलेल्या पावसामुळे बुधवारी सायंकाळपासून समुद्रपूर तालुक्यातील लालनाला प्रकल्पाचे पाच गेट २५ से.मी. उघडण्यात आले असून त्यातून ६४.२५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच नांद प्रकल्पाचीही पातळी वाढल्याने सात गेट ३० से.मी.ने उघडले आहे. पोथरा प्रकल्पात ९५.३० टक्के जल संचय झाल्याने सांडव्यावरुन पाणी वाहत असल्याने परिसरातील नदी, नाल्यांना पूर आला आहे.

पावसाची संततधार; जलाशयांच्या पातळीत वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/समुद्रपूर : गेल्या दोन आठवड्यापेक्षा अधिक काळापासून जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा होती. बुधवारी पहाटे सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यानंतर गुरुवारी दुपारपासून सततधार कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या जलाशयांची पाणी पातळी वाढल्याने नदी-नालेही फुगले आहे. समुद्रपूर तालुक्यातील पोथरा प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने वीस गावांचा संपर्क तुटला. यासोबतच जिल्ह्यातील इतरही जलाशयाची पातळी वाढल्याने पाटबंधारे विभागाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात सर्वदूर सुरु असलेल्या पावसामुळे बुधवारी सायंकाळपासून समुद्रपूर तालुक्यातील लालनाला प्रकल्पाचे पाच गेट २५ से.मी. उघडण्यात आले असून त्यातून ६४.२५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच नांद प्रकल्पाचीही पातळी वाढल्याने सात गेट ३० से.मी.ने उघडले आहे. पोथरा प्रकल्पात ९५.३० टक्के जल संचय झाल्याने सांडव्यावरुन पाणी वाहत असल्याने परिसरातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. आर्वी तालुक्याती निम्न वर्धा प्रकल्पही ७०.६४ टक्के भरल्याने पाटबंधारे विभागाने सायंकाळी ६ वाजतापासून तीन गेट ५ से.मी. उघडण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील जलाशयातून पाणी सोडले जात असल्याने सर्वत्र पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात सकाळपासून तर कुठे दुपारपासून संततधार सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच शेतीचेही कामे थांबली असून नदीकाठच्या शेतामध्ये पाणी साचले.
कोरा परिसरात गावांत शिरले पुराचे पाणी
- कोरा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून परिसरातील नदी, नाल्यांना दहा ते बारवेळा पूर आला आहे. लालनाप्रकल्पाचे पाणी सोडल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील शेतासह गावातही पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्य रस्त्यांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाल्याने येण्या-जाण्याचा मार्गही काही काळ बंद झाला होता.
वडगाव-पिंपळगाव मार्गावरील वाहतूक ठप्प
- समुद्रपूर तालुक्यातील पोथरा नदीला पूर आल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. सकाळी कामानिमित्य बाहेरगावी गेलेले नागरिकांना अलीकडच्या गावातच थांबावे लागले. वडगांव ते पिंपळगाव मार्गाची वाहतूक थांबली असून सायगव्हाण, सावंगी, लोखंडी व पिंपळगाव या गावाचा संपर्क तुटला. दोन व्यक्ती वाहून गेल्याने तहसीलदार राजू रणवीर, ना. तह. किरसान, ठाणेदार हेमंत चांदेवार व धमेंद्र तोमर शोध घेत आहे.