अल्लीपुरात ‘एमपी’ची दारू भरलेला कंटेनर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:01 IST2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:01:06+5:30
मध्यप्रदेशातील दारूसाठा भरलेला कंटेनर उतरल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. येथूनच शहरात मागील तीन दिवसांपासून मोठ्याप्रमाणात दारू पुरवठा होत असल्याने तळीरामांना सुगीचे दिवस आले आहे. त्यामुळे पोलीस विभाग याची दखल घेईल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अल्लीपुरात ‘एमपी’ची दारू भरलेला कंटेनर?
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लॉकडाऊन काळात इतर जिल्हे ‘ड्राय’ असतानाच वर्धा हा दारूबंदी जिल्हा मात्र, दारूविक्रीसाठी ‘ग्रीनझोन’ ठरला. अल्लीपूर येथे एका राजकीय वलयात वावरणाऱ्या व्यक्तीकडे चक्क मध्यप्रदेशातील दारूसाठा भरलेला कंटेनर उतरल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. येथूनच शहरात मागील तीन दिवसांपासून मोठ्याप्रमाणात दारू पुरवठा होत असल्याने तळीरामांना सुगीचे दिवस आले आहे. त्यामुळे पोलीस विभाग याची दखल घेईल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
थोर पुरुषांचा सहवास वर्धा जिल्ह्याला लाभला आहे. सेवाग्राम ही महात्मा गांधीजींची कर्मभूमी असल्याने वर्धा जिल्ह्यात पूर्णपणे दारूबंदी झाली. पण, तरीदेखील याच जिल्ह्यात कोटी रूपयांच्या दारूची उलाढाल होते. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील विविध गावांमध्ये विदेशी दारूचे पाट वाहताना दिसतात. त्यामुळे महापुरुषांच्या जिल्ह्याला दारूने ‘कंलक’ लावल्याचे चित्र आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली. मद्यविक्रीही बंद होती. पण, वर्धा जिल्हा याला अपवाद ठरला.
वर्धा जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात विदेशीसह गावठी दारू मद्यपींना सहजच उपलब्ध झाली.
शौकिनांच्या खिशाचा अंदाज घेत वाट्टेल त्या दरान विदेशी दारू विकल्या गेली आणि अजूनही विकल्या जात आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात जिल्हा सीमा बंद असताना वर्ध्यात येणारी दारू येते तरी कुठून, हा प्रश्न सहज उपस्थित होतो. अशातच अल्लीपूर येथील तथाकथीत होलसेल दारूविक्रेत्याने मध्यप्रदेशातील दारूसाठा उतरविल्याची खमंग चर्चा आहे.
अल्लीपूर येथूनच संपूर्ण जिह्यात दारूचा पुरवठा होतो. अल्लीपूर येथील एका व्यक्तीचा अनेक वर्षांपासून दारूविक्रीचा व्यवसाय आहे. त्याच्यावर दारूबंदी कायद्यांतर्गत कारवायाही झाल्या. तो व्यक्ती हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून दारूची खुलेआम विक्री करीत असल्याचे बोलल्या जात आहे.
लॉकडाऊन असतानाही दोन दिवसांपूर्वी या व्यक्तीच्या हॉटेलमागील शेतात मध्यप्रदेश येथून आलेला दारूसाठा भरलेला कंटेनरच उतरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
मोठ्याप्रमाणात दारू उतरवून जिल्ह्यातील गावागावांत पोहोचविण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी याची सखोल चौकशी करून सत्यता पुढे आणण्याची गरज आहे.
दारूविक्रेत्याने केले होते पलायन
तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दारूविक्रेत्यांना सळो की पळो करून सोडले होते. शहरातील अनेक दारूविक्रेत्यांनी दारूविक्रीचा व्यवसाय बंद करून पर्यायी व्यवसाय सुरू केला होता. त्याचदरम्यान अल्लीपूर येथील दारूविक्रेत्याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. परंतु, आता पोलिसांचा धाक संपल्याचे बोलल्या जात आहे.
अल्लीपुर येथे दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. पण, मध्यप्रदेशातून कंटेनरने दारूसाठा उतरल्याची मला माहिती नाही. मी याबाबत संबंधित ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेते, जर दारूविक्र गावात सुरू असेल तर नक्कीच कारवाई करण्यात येईल.
तृप्ती जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, देवळी-पुलगाव.