गावात तात्काळ संपर्कासाठी संपर्क गट तयार करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 23:53 IST2019-03-27T23:53:15+5:302019-03-27T23:53:59+5:30
जिल्हास्तरावरून एखादी सूचना तात्काळ गावामध्ये पोहचण्यासाठी तलाठी, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांचे संपर्क गट तयार करावा. त्यांना प्रशिक्षण देऊन, निवडणुक आचारसंहितेच्या काळात तात्काळ संपर्क होण्यासाठी किंवा गावस्तरावरून काही माहिती प्राप्त करण्यासाठी तयार करावे अशा सूचना मुख्य निवडणूक निरीक्षक एन .टी. अबरु यांनी केल्यात.

गावात तात्काळ संपर्कासाठी संपर्क गट तयार करावा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हास्तरावरून एखादी सूचना तात्काळ गावामध्ये पोहचण्यासाठी तलाठी, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांचे संपर्क गट तयार करावा. त्यांना प्रशिक्षण देऊन, निवडणुक आचारसंहितेच्या काळात तात्काळ संपर्क होण्यासाठी किंवा गावस्तरावरून काही माहिती प्राप्त करण्यासाठी तयार करावे अशा सूचना मुख्य निवडणूक निरीक्षक एन .टी. अबरु यांनी केल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांच्या नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अप्पर जिल्हाधिकारी सचिन दैने, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जिल्ह्याची माहिती पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे दिली. यामध्ये मतदान केंद्र तेथील सुविधा, दिव्यांग मतदारांसाठीच्या सुविधा, खर्च चमू आणि त्यांची कार्यपद्धती, जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था, स्थिर पथक, चलचित्र चमू, आणि चित्रफीत पाहणारी चमू यांचे गठन केल्याची माहिती दिली. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यात आवश्यक मनुष्यबळ आणि उपलब्धता, त्यांचे प्रशिक्षण यांची सुद्धा माहिती भिमनवार यांनी दिली.
यावेळी पोलीस अधीक्षक तेली यांनी जिल्ह्यातील सीमेवर तैनात करण्यात आलेल्या चमुची माहिती दिली. त्याचबरोबर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून शस्त्र जप्ती, दारू साठ्याची जप्ती आणि स्थिर सर्वेक्षण पथकाने पकडलेली रोख याची माहिती दिली. जिल्ह्यात पोलिस अधिकारी कर्मचारी यांची उपलब्धता आणि कमतरता याची सुद्धा माहिती दिली.
जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांनी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार जनजागृती कार्यक्रमाचे पॉवर पॉईंट सादरीकरण केले. यामध्ये मतदार जागृती क्लब, राष्ट्रीय मतदार दिनी केलेली मानवी आणि रंगांची रांगोळी, चुनावी पाठशाळा, आयोगाकडून आलेले खेळ , व्ही व्ही पॅट जनजागृती आदींबाबत माहिती दिली. तसेच माध्यम कक्ष सुरू करण्यात आल्याचे सांगून सर्व माध्यमांवर सूक्ष्म नजर ठेवण्यात येत असल्याचे सांगितले. याशिवाय तालुकास्तरावरील कामाचा आढावा त्यांनी जाणून घेतला.
मतदान केंद्रावर सुविधा पुरवा
अबरु यांनी सर्व मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा पोहचविण्यात याव्यात तसेच दिव्यांग मतदारांना रॅम्प, व्हील चेअर आदी सुविधा पुरविण्याच्या सूचना केल्यात. या बैठकीला उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रवीण महिरे, जिल्हा परिषद मुख्य लेखाधिकारी एस बी शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेभुर्णेे, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी ठवळे, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता गजानन टाके, महेश मोकलकर, मुन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर उपस्थित होते.