सिलिंडर अनुदानाबाबत ग्राहकांत संभ्रम
By Admin | Updated: December 13, 2014 02:07 IST2014-12-13T02:07:46+5:302014-12-13T02:07:46+5:30
गॅस ग्राहकांना सिलिंडरवर मिळणारे अनुदान पुन्हा एकदा बॅँकेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

सिलिंडर अनुदानाबाबत ग्राहकांत संभ्रम
दारोडा : गॅस ग्राहकांना सिलिंडरवर मिळणारे अनुदान पुन्हा एकदा बॅँकेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यापूर्वी अनेक ग्राहकांना या अनुदानाची रक्कम मिळविताना चांगलाच मनस्ताप झाला़ काही ग्राहकांची अनुदानाची रक्कम कुठे गेली, याचा थांगपत्ता लागला नाही. यामुळे अनेक गॅस धारकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
ग्रामीण भागातील ग्राहकांना बॅँकेत हेलपाटे मारणे परवडणारे नाही़ यामुळे अनुदान मिळविण्याकरिता हा खटाटोप कशाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ सर्वसामान्य शेतकरी व शेतमजूर यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. घर चालविण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यंदाचे साल शेतीला पूरक नसल्याने कुटुंब प्रमुखाला पेच पडला आहे. मध्यंतरी ही योजना बंद झाल्याने सुटका झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत होती. यापुढे ग्राहकांना सिलिंडर घेताना आता जादा रकमेची जुळवाजुळव करावी लागणार आहे. यानंतर आपले पैसे आपल्यालाच मिळविण्यासाठी तासन्तास बॅँकेत रांगा लावून प्रतीक्षा करावी लागते. ज्या गावात बॅँकच नसेल, त्या शेतकऱ्याला, शेतमजुराला २०० ते ३०० रुपये मजुरी पाडून अनुदानासाठी थांबावे लागते़ यामुळे घडाईपेक्षा मडाईच अधिक, अशा प्रतिक्रियाही उमटत आहे.
सरकार बदलले खरे; पण त्याच त्रासदायक योजना कायम राहत असेल तर परिवर्तनाचा उपयोग काय, असा सवाल सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत़ या संपूर्ण संभ्रमावस्थेमुळे नागरिक त्रस्त असून योजना रद्द करण्याची मागणी होत आहे़(वार्ताहर)