संविधान दिन कार्यक्रम घेणे सर्वांना अनिवार्य
By Admin | Updated: November 26, 2015 02:02 IST2015-11-26T02:02:00+5:302015-11-26T02:02:00+5:30
थोर पुरूषांच्या जयंती, पुण्यतिथीसह काही विशेष दिन राज्यस्तरावर साजरे केले जातात. त्यानिमित्त सर्वांनी कार्यक्रम घेणे अपेक्षित असते; ...

संविधान दिन कार्यक्रम घेणे सर्वांना अनिवार्य
दिन विशेष : शासन परिपत्रकासह शिक्षणाधिकाऱ्यांचेही निर्देश
वर्धा : थोर पुरूषांच्या जयंती, पुण्यतिथीसह काही विशेष दिन राज्यस्तरावर साजरे केले जातात. त्यानिमित्त सर्वांनी कार्यक्रम घेणे अपेक्षित असते; पण अनेक ठिकाणी अशा कार्यक्रमांना बगल दिली जाते. परिणामी, शासनाने परिपत्रक काढून ‘संविधान दिन’ कार्यक्रम घेणे अनिवार्य केले आहे.
भारतीय संविधानाबाबत जागृती व्हावी, नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी म्हणून राज्यात दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंतीही आहे. हे औचित्य साधून संविधान दिन राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. यासाठी परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. यात कोणते उपक्रम घ्यावे, हे देखील सांगण्यात आले आहे.
राज्यात शासकीय, निमशासकीय कार्यालये, जि.प., पं.स., ग्रा.पं., महानगरपालिका, नगर पालिका, सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्य. शाळा, महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम घेणे अनिवार्य आहे. यात संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन, जागृतीसाठी शाळा, महाविद्यालयांद्वारे संविधान यात्रा काढणे, प्रस्ताविका, मुलभूत हक्क, कर्तव्ये व जबाबदाऱ्या आदी कलमे ठळक दिसतील, असे बॅनर्स, पोस्टर्स वापरण्याच्या सूचना आहेत. निबंध, भितीपत्रके, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याच्या सूचना आहेत. शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांनी संविधान जनजागृतीपर व्याख्याने घेण्याचेही निर्देशित केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)