पूर्णत्वास येण्यापूर्वीच कालव्यांची दुरवस्था

By Admin | Updated: October 14, 2014 23:22 IST2014-10-14T23:22:32+5:302014-10-14T23:22:32+5:30

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती ओलिताखाली आणता यावी, उद्योगांनाही पाणी मिळावे या हेतूने निम्न वर्धा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली़ महत्प्रयासाने निम्न वर्धा प्रकल्प तर पूर्ण झाला;

Before the completion of the canals, | पूर्णत्वास येण्यापूर्वीच कालव्यांची दुरवस्था

पूर्णत्वास येण्यापूर्वीच कालव्यांची दुरवस्था

वर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती ओलिताखाली आणता यावी, उद्योगांनाही पाणी मिळावे या हेतूने निम्न वर्धा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली़ महत्प्रयासाने निम्न वर्धा प्रकल्प तर पूर्ण झाला; पण अद्यापही कालव्यांची कामे रेंगाळत सुरूच आहेत़ ‘पुढचे पाठ, मागचे सपाट’ याप्रमाणे ही कामे सुरू असून पूर्णत्वास येण्यापूर्वीच कालवे नादुरूस्त होत आहेत़ यामुळे शेतकऱ्यांनाच नुकसान सोसावे लागमा आहे़
आर्वी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर) येथे निम्न वर्धा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली़ या प्रकल्पातून निघणारा मुख्य कालवा रोहणा, सोरटा, पुलगाव या गावांतून पुढे यवतमाळ जिल्ह्यातील गावांपर्यंत जोडण्यात आला आहे़ या कालव्याची कामे विविध कंपन्यांना देण्यात आली आहेत़ यात देवळी तालुक्यातील बहुतांश काम घेतलेली कंत्राटदार कंपनी योग्यरित्या बांधकाम करीत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे़ पडेगाव येथे बांधकाम सुरू असतानाच कालवा फुटून शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते़ अद्यापही हा कालवा पूर्णत्वास गेलेला नाही़ असे असताना पुलगाव शहरात अनेक ठिकाणी या कालव्यात सिमेंटीकरण झालेल्या भागात गवत व अन्य वनस्पती उगवल्याचे दिसते़ शिवाय अनेक ठिकाणी सिमेंट-काँक्रीटचे काम अर्धवटच करण्यात आलेले आहे़ यामुळे खोदकामही पुन्हा करावे लागत असल्याचे दिसून येत आहे़
कित्येक वर्षांपासून सुरू असलेले कालव्याचे काम अनेक दिवस निधीमुळे रेंगाळले तर अनेक ठिकाणी कंत्राटदार कंपन्यांच्या निष्काळजीपणामुळे रेंगाळल्याचे दिसते़ यामुळे शेतकऱ्यांचे ओलिताचे स्वप्न अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देत सदर कंत्राटदार कंपनीला जाब विचारावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करावी, अशी मागणी होत आहे़ शिवाय कालव्याच्या बांधकामाचा दर्जा राखला जावा, यासाठी अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देत कालवा पूर्ण करून घेणे गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Before the completion of the canals,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.