१०.७४ लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराची तक्रार
By Admin | Updated: July 9, 2016 02:20 IST2016-07-09T02:20:38+5:302016-07-09T02:20:38+5:30
येथील विशाल विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे २०१४-१५ मध्ये अंकेक्षण करण्यात आले.

१०.७४ लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराची तक्रार
सिंदी विविकातील प्रकरण : अंकेक्षकाने नोंदविली पोलिसांत तक्रार
सिंदी (रेल्वे) : येथील विशाल विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे २०१४-१५ मध्ये अंकेक्षण करण्यात आले. यात १० लाख ७४ हजार ८८४ रुपयांची अफरातफर झाल्याची निदर्शनात आले. यावरून संस्थेचा विक्री प्रतिनिधी, शिपाई गणेश पांडूरंग चांदेकर याच्या विरोधात उपलेखा परिक्षक सहकारी संस्थेचे अंकेक्षक गजानन बोंदरे यांनी सिंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
संस्थेत विक्री प्रतिनिधी, शिपाई गणेश चांदेकर याने रासायनिक खते, बी-बियाणे यांची परस्पर विक्री करून १० लाख ७४ हजार ८८४ रुपयांची अफरातफर केल्याचे तपासणीत समोर आले. यामुळे गणेश चांदेकर विरूद्ध पोलिसांत अंकेक्षकाने तक्रार दाखल केली.
या प्रकरणी ठाणेदार वसंत मोहूर्ले यांनी भांदविच्या ४२०, ४७७ अ, ४०८ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश शाही, हवालदार चंद्रकांत मेघरे करीत आहेत. या प्रकरणात झालेल्या तक्रारीवरून एकाच व्यक्तीकडे इतके प्रभार कसे अशी शंका ठाणेदार मोहर्ले यांनी व्यक्त केली.
या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत असून यात आणखी मोठे मासे गळाला लागणार असा अंदाज ठाणेदारांनी व्यक्त केला आहे.(वार्ताहर)