बियाणे पिकांबाबत तक्रार निवारणासाठी समिती
By Admin | Updated: May 15, 2014 01:40 IST2014-05-15T01:40:39+5:302014-05-15T01:40:39+5:30
कापूस बियाणे व पिकांच्या संबंधात सर्व तक्रारीचे निवारण करण्याकरिता जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने समिती स्थापन केली आहे.

बियाणे पिकांबाबत तक्रार निवारणासाठी समिती
वर्धा : कापूस बियाणे व पिकांच्या संबंधात सर्व तक्रारीचे निवारण करण्याकरिता जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने समिती स्थापन केली आहे. शेतकर्यांनी तक्रार असल्यास जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विकास अधिकारी आर. के. गायकवाड यांनी केले आहे.
बियाणे, खते, कीटकनाशक या निविष्ठा दज्रेदार नसल्यास व भेसळ असल्यास तसेच बियाणे उगवणीबाबत तक्रारीकरिता उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती शासनाने स्थापन केलेली आहे. तक्रार असल्यास शेतकर्यांनी पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी या कार्यालयात लेखी तक्रार नोंदवावयाची आहे.
कृषी निविष्ठांविषयी असलेल्या अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी किंवा मार्गदर्शनासाठी कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक १८00२३३४000 देण्यात आला आहे.
बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके खरेदी करताना शेतकर्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणार्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीस प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. बनावट किंवा भेसळयुक्त बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशक खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह निविष्ठा खरेदी करावे, विना पावतीने कोणतीही निविष्ठा खरेदी करू नये. खरेदी केलेल्या बियाणाचे वेष्टन किंवा पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणेची पाकिटे सिलबंद किंवा मोहरबंद असल्याची खात्री करावी, बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्या. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमंतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषीविभागाने केले आहे.(शहर प्रतिनिधी)