वर्धेत बंदला संमिश्र प्रतिसाद
By Admin | Updated: February 23, 2015 01:41 IST2015-02-23T01:41:37+5:302015-02-23T01:41:37+5:30
कोल्हापूर येथे अज्ञात मारेकऱ्यांनी कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर हल्ला केला़ यात मृत्यूशी झुंज देताना गोविंद हरले़ ...

वर्धेत बंदला संमिश्र प्रतिसाद
वर्धा : कोल्हापूर येथे अज्ञात मारेकऱ्यांनी कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर हल्ला केला़ यात मृत्यूशी झुंज देताना गोविंद हरले़ या निषेधार्थ विविध परिवर्तनवादी संघटनांच्यावतीने रविवारी दोन तासांकरिता प्रातिनिधिक स्वरुपात बंद पुकारला. या बंदला शहरातील व्यवसायिकांनी प्रतिसाद दिला. काही दुकाने बंद होती तर बाजार परिसरातील काही प्रतिष्ठाने उघडी होती. यावेळी विविध संघटनांनी मारेकऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
सकाळी काही काळाकरिता बंद असलेली दुकाने दोन तासाच्या आतच उघडण्यात आली. यानंतर विविध संघटनांद्वारे कॉ. पानसरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिवाय हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली़ बंद दरम्यान जिल्ह्यात कुठलीही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही़ जिल्ह्यातील विविध संघटनांच्यावतीने कॉ. पानसरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शोक संवेदना व्यक्त करताना कॉ. पानसरे यांचे निधन झाले तरी त्यांचे विचार जिवंत राहतील. पानसरे हे एका व्यक्तीचे नाही तर विचाराचे नाव आहे, असेही विचार अनेकांनी यावेळी व्यक्त केले.