हवेचा दाब वाढल्याने थंडी
By Admin | Updated: November 21, 2015 02:24 IST2015-11-21T02:24:14+5:302015-11-21T02:24:14+5:30
वातावरणातील दाबामुळे तापमानात चढउतार होतो. सद्य:स्थितीत हवेतील दाब वाढतीवर असल्याने थंडीला सुरुवात झाली आहे.

हवेचा दाब वाढल्याने थंडी
पारा घसरला : नोव्हेंबरमध्येच १५.६ पर्यंत घसरण
श्रेया केने वर्धा
वातावरणातील दाबामुळे तापमानात चढउतार होतो. सद्य:स्थितीत हवेतील दाब वाढतीवर असल्याने थंडीला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी तापमान १५.६ पर्यंत उतरले. आठवड्याभरापासून तापमानातील घटीमुळे थंडी जाणवत आहे.
हवेतील दाब १ हजार १० मिलीबार पोहचल्याने तापमानात घट झाली. शिवाय आकाश स्वच्छ असल्याने वातावरणात गारवा जाणवत आहे. दक्षिण भारतात आलेल्या वादळामुळे राज्यातील हवामानावर याचा परिणाम होवू शकतो, असा अंदाज हवामानात तज्ज्ञांचा होता. दक्षिण भारतात वादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वातावरण ढगाळ असून पाऊस पडत आहे. हा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्यास ढगाळ वातावरण तयार होवून थंडीचे प्रमाण कमी झाले असते. मात्र हा कमी दाबाचा पट्टा अंदमानच्या दिशेने सरकल्याने ढगाळ वातावरणाचा धोका नाही. ढगाळ वातावरणामुळे पिकांवरही याचा विपरीत परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांन चिंंता व्यक्त होत होती मात्र सध्या हा धोका नसल्याने तज्ज्ञांनी सांगितले.
महाराष्ट्र ते जम्मूपर्यंत आकाश निरभ्र असल्याने थंडी कायम
जिल्ह्यातील तापमानात १३ नोव्हेंबरपासून घट जाणवत आहे. कमाल आणि किमान तापमान घसरल्याने थंडी जाणवायला लागली आहे. हवेतील ‘डिप्रेशन’मुळे सकाळच्या सुमारास वारा वाहतो. १८ नोव्हेंबरला किमान तापमान १५.६ पर्यंत खाली आल्याने थंडीची चाहुल लागली आहे. शिवाय कमी दाबाचा पट्टा दक्षिण दिशेने सरकल्याने महाराष्ट्र ते जम्मूपर्यंत आकाश निरभ्र असल्याची बाब उपग्रहाच्या छायाचित्रावरुन स्पष्ट झाली आहे. यामुळे थंडी कायम राहुन यात वाढ होईल असे दिसून येते.
‘डिप्रेशन’मध्ये बदल होण्याची चिन्हे नाही
जिल्ह्यात साधारणत: १२ ते १५ नोव्हेंबरपासून थंडीला प्रारंभ होतो, असे आजवरचा नोंदीतून दिसून येते. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात थंडीचा प्रकोप जाणवतो. उत्तरेत हिमवृष्टी झाल्यास कडाक्याची थंडी जाणवते. नोव्हेंबर महिन्यात थंडीची चाहुल जाणवायला लागते. वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असल्याने ‘डिप्रेशन’मध्ये बदल होण्याची चिन्हे नाही, अशी माहिती संबंधितांनी दिली.