प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीविरोधात कुंभारांचा एल्गार
By Admin | Updated: July 22, 2015 02:47 IST2015-07-22T02:47:43+5:302015-07-22T02:47:43+5:30
दिवसेंदिवस प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर वाढत आहे. उत्सव साजरा झाल्यानंतर या मूर्ती नदीत विसर्जित करण्यात येतात.

प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीविरोधात कुंभारांचा एल्गार
मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना घातले बंदीकरिता साकडे
वर्धा : दिवसेंदिवस प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर वाढत आहे. उत्सव साजरा झाल्यानंतर या मूर्ती नदीत विसर्जित करण्यात येतात. परिणामी पर्यावरणाचा ऱ्हास होतो. यामुळे अशा मूर्ती विक्रीस पायबंद घालावा व इतर मागण्यांसह जिल्हा कुंभार कारागीर एकता संघटनेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावाडकर यांना निवेदन देत त्यांच्याशी चर्चा केली.
सादर केलेल्या निवेदनानुसार, गणेश, दूर्गा उत्सवामध्ये प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तींचा वापर करण्यात येतो. त्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. पाण्याचे झरे बंद होतात. त्यामुळे राष्ट्रीय संपत्तीचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. सन २००९ च्या औरंगाबाद उच्च न्यायालयाचे आदेशाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिका, चंद्रपूर महानगरपालिका यांनी प्लास्टर आॅफ पॅरिस बंदीचे आदेश काढत तशा मूर्ती बनविणाऱ्या कारागीरांना, कुंभारांना नोटीस बजावले आहेत. त्या धर्तीवर वर्धेतही नोटीस बजावण्याची मागणी करण्यात आली. याकरिता कुंभार समाज बांधवांनी मगनसंग्रहालय परिसरातून मोर्चा काढला. यात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून गेल्यानंतर न्यायालयाच्या मुख्यद्वाराजवळ त्यांना अडविण्यात आले. यानंतर एका शिष्टमंडळाने मागण्यांचे निवदेन सादर केले.(प्रतिनिधी)