मानवी श्रुंखलेतून नदीपात्राची स्वच्छता
By Admin | Updated: September 29, 2015 03:37 IST2015-09-29T03:37:45+5:302015-09-29T03:37:45+5:30
येथील धाम नदीपात्रात दोन दिवसांत हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. त्यामुळे पाणीही मोठ्या प्रमाणात प्रदूषित

मानवी श्रुंखलेतून नदीपात्राची स्वच्छता
पवनार : येथील धाम नदीपात्रात दोन दिवसांत हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. त्यामुळे पाणीही मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले. हे प्रदूषण थांबविण्यासाठी स्वच्छ भारत मिशनच्या कार्यकर्त्यांनी काही महाविद्यालयांच्या सहकार्याने सोमवारी नदीस्वच्छता उपक्रम हाती घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी नदीपात्रातील मूर्ती काढून त्यांचे नव्याने पर्यावरणपुरक कुंडात विसर्जन केले.
शासनाद्वारे प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी असली तरी त्या बनविल्या जातातच. अश्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्यामुळे शिरविल्यावर नदीपात्रात त्या महिनोंमहिने तश्याच राहतात. त्यावरील रंग उडाल्यानंतर या मूर्ती पाहताना अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. ही बाब विचारात घेत स्वच्छ भारत मिशनने नदीपात्रात शिल्लक असलेल्या मूर्तींचे अवशेष डॉ. आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सोमवारी नपीदात्राबाहेर काढून त्या नव्याने पर्यावरणपुरक कुंडात शिरविल्या. सोबतच नदीपात्रातील निर्माल्याचीही विल्हेवाट लावली.
गतवर्षी धाम नदीपात्रात दोन ते तीन महिने गणेशमूर्तींचे अवशेष पाण्यात न वरघळल्यामुळे नदीपात्रात पडून होते. राहिलेल्या अवशेषांचा चित्र-विचित्र आकार बघून सर्वांनाच किळस येत होता. तसेच मोठ्या प्रमाणात मलबाही मोळा झाला होता. परंतु यंदाच्या उपक्रमाने नदीपात्र स्वच्छ झाले असून नागरिकही समाधान व्यक्त करीत या उपक्रमाचे कौतुक करीत आहे.
जि. प. माहिती शिक्षण संवाद सल्लागार महेश डोईजोड यांनी निलेश डोफे, अरविंद बलवीर, सचिन खाडे, विनोद खोब्रागडे आदी सहकारी व डॉ. आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी लोकेश गांडोळे, रवी कांबळे, विशाल तडस, साजना खोडके, प्रगती वावरे, धम्मशिला जवादे, स्मिता लोहकरे, शाहिस्ता शेख, मंजू मेश्राम, ज्ञानेश्वरी अंबुलकर, मोनाली शेंडे, पायल बेलखोडे, भाग्यश्री इंगळे, करूणा सुटे, विद्या सुरजुसे यांच्या सहकार्याने नंदीखेडा व छत्री परिसरातील सर्व कचरा, निर्माल्य एकत्र करून परिसर स्वच्छ व सुंदर केला. पवनार येथील ग्रामस्थ व विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. (वार्ताहर)
नदीपात्रात उतरून विद्यार्थिनींनी मूर्ती काढल्या बाहेर
४या उपक्रमात डॉ. आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मानवी श्रुंखलेतून गणेशाच्या मूर्ती बाहेर काढण्याबरोबरच मुलींनी नदीपात्रात स्वत: उतरून गणपतीच्या मूर्ती बाहेर काढल्या. पहिल्यांदाच हा प्रकार येथे पहावयास मिळाला. मुलींचा हा सहभाग पाहून सर्वांनीच त्यांचे कौतुक केले. सोबतच निर्माल्य बाहेर काढून त्याची योग्य विल्हेवाटही लावली. या मूर्ती बाहेर काढताना कुठल्याही प्रकारची भीती वा किळस त्यांना वाटला नाही. उलट आपण स्वच्छतेच्या कामात भरीव मदत करीत असल्याच्या बोकल्या प्रतिक्रिया या विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या.
पर्यावरणपूरक गणेश कुंडात विसर्जन
४केवळ मूर्ती बाहेर काढून त्यांचा ढीग मारून ठेवल्यास त्यांची पुन्हा विटंबना होईल ही बाब ध्यान्यात घेत या मूर्तींचे नव्याने पर्यावरणपूरक गणेश कुंडात विसर्जन करण्यात आले. मूर्तींची कुठल्याही प्रकारे विटंबना होणार नाही हा यामागील उद्देश होता. त्यामुळे सर्वांनीच या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच या उपक्रमादरम्यान कुठलीही आडकाठी न आणता त्याला मदतच केली. त्यामुळे नदीपात्र स्वच्छ होऊन मूर्तींची होणारी विटंबना थांबली.
शेकडो मूर्ती झाल्या जमा
४शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी पवनार येथील धाम नदीपात्रात हजारो मूर्तींचे विसर्जन झाले. शासनाद्वारे प्लास्टर आॅफ पॅरिसचा गणेशमूर्ती बनविताना वापर न करण्याच्या सूचना केल्या होत्या. असे असतानाही मूर्तींमध्ये प्लास्टर आॅफ पॅरिस असल्याचे निदर्शनास येत होते. केवळ शादूच्या मातीची मूर्ती असल्यास ती काही तासातच पाण्यात पूर्णपणे विरघळून जाते. परंतु यातील अनेक मूर्ती जशाच्या तश्या असल्याने त्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या असाव्या अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
निर्माल्याचीही विल्हेवाट
४नदीपात्रात निर्माल्य जाणार नाही याचीही स्वच्छ भारत मिशनच्या कार्यकर्त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. प्रत्येक मूर्ती तपासून त्यांनी हार कुले गोळा केली.