आजपासून दहावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:00:53+5:30
परीक्षा काळात गैरप्रकार होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार उपाययोजना करण्यात येत आहे. कॉपीमुक्त परीक्षा राबविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात भरारी पथक तयार करण्यात आले आहे.

आजपासून दहावीची परीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. शिक्षण विभागाने परीक्षेची तयारी पूर्ण केली असून दहावीच्या परीक्षेकरिता जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकूण ७५ परीक्षा केंद्र सज्ज आहे. या परीक्षा केंद्रावरुन १९ हजार ८६५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
परीक्षा काळात गैरप्रकार होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार उपाययोजना करण्यात येत आहे. कॉपीमुक्त परीक्षा राबविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात भरारी पथक तयार करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये यापूर्वी दहावीच्या परीक्षेदरम्यान ज्या केंद्रावर गैरप्रकार आढळून आला तेथे बैठे पथकाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार असून परीक्षेचे चित्रिकरणही केले जाणार आहे. परीक्षा केंद्राच्या १०० मीटरपर्यंत कोणालाही फिरकता येणार नाही.
सध्या बारावीची परीक्षा सुरु असून उद्यापासून दहावीचीही परीक्षा सुरु होत आहे. या दोन्ही परीक्षांची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागावर असल्याने शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या नेतृत्वात यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूणच कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रयत्न होणार असून विद्यार्थ्यांनीही वेळेच्या एक तासापूर्वी परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता, दडपणही
शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांकरिता व त्यांच्या पालकांना दहावीची परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. दहावीच्या परीक्षेच्या निमित्ताने पहिल्यांदाच विद्यार्थी शाळेबाहेरील परीक्षा केंद्रावर सर्व पेपर देण्यासाठी जात असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेसंदर्भात उत्सुकता आणि तितकेच दडपणही आहे. वर्षभरापासून परीक्षेची तयारी केली असताना आता तीन तासाच्या परीक्षेत कितपण यश मिळते. यावरच परीक्षेचा निकाल ठरणार आहे.
सात भरारी पथकांची करडी नजर
जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा व्हावी याकरिता सात भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण, विशेष महिला भरारी पथक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या पथकाचा समावेश असून हे सातही पथक जिल्ह्यातील शाळांवर वॉच ठेवणार आहे. यासह तालुका पातळीवरही पथक नियुक्त करण्यात आले आहे.