सभापतींनी घेतला कापूस व्यापाऱ्यांचा ‘क्लास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 21:45 IST2018-02-18T21:45:28+5:302018-02-18T21:45:47+5:30
बाजार समितीच्या यार्डमध्ये लिलाव झाल्यानंतर ठरलेल्या भावावर कायम न राहता प्रती क्विंटल ५०० रुपयांपर्यंत दर कमी दिले जात आहे. व्यापाऱ्यांच्या जीनिंगमध्ये गाडी खाली करताना कापसाच्या गुणवत्तेचे कारण सांगून नागविले जात आहे.

सभापतींनी घेतला कापूस व्यापाऱ्यांचा ‘क्लास’
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : बाजार समितीच्या यार्डमध्ये लिलाव झाल्यानंतर ठरलेल्या भावावर कायम न राहता प्रती क्विंटल ५०० रुपयांपर्यंत दर कमी दिले जात आहे. व्यापाऱ्यांच्या जीनिंगमध्ये गाडी खाली करताना कापसाच्या गुणवत्तेचे कारण सांगून नागविले जात आहे. याबाबत तक्रारी मिळताच कृउबास सभापती मनोहर खडसे यांनी लिलाव थांबवून तब्बल तीन तास संबंधित व्यापाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला.
कापसाच्या गुणवत्तेवरून एकदा ठरलेला भाव व्यापाऱ्यांना परस्पर कमी करता येणार नाही. अशा कापूस गाड्यांची प्रत्यक्ष पाहणी व पंचनामा करून भाव कमी-अधिक करण्याचा अधिकार बाजार समितीकडे राहील, असे निर्देशही सभापती खडसे यांनी खासगी व्यापाºयांना बैठकीत दिले.
कापसाची मुख्य बाजारपेठ म्हणून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते. येथील यार्डमध्ये भावबाजीतील तफावतीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांत संंभ्रम निर्माण झाला होता. लिलावाच्या वेळी वेगळा भाव तसेच जीनिंगमध्ये गाडी खाली करताना गुणवत्तेचे कारण सांगून कमी भाव दिला जात होता. या सर्व प्रकारात शेतकऱ्यांची लूट होत असल्याची ओरड होती. या बाजार समितीत आजपर्यंत ३.७५ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यात केवळ १५ हजार क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने तर उर्वरित खरेदी खासगी व्यापाऱ्यांनी केली. सीसीआयची खरेदी असल्याने या बाजारपेठेत बऱ्यापैकी भाव मिळत असल्याचे सांगितले जाते. असे असले तरी विविध कारणे देत ठरलेला भाव कमी करण्याचा प्रकार होत आहे. या बाजारपेठेची पत कायम ठेवण्यासाठी सीसीआयने खरेदीचा टक्का वाढवून अधिकाधिक कापूस खरेदी करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.