शहरालगतचे हॉटेल बनले बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:44 IST2019-03-09T00:43:25+5:302019-03-09T00:44:03+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, वर्धा शहरालगत असलेले हॉटेल व ढाबे सध्या अवैध दारूविक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. येथे दररोज कोट्यवधी रूपयाची दारू विकली जात आहे.

शहरालगतचे हॉटेल बनले बार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, वर्धा शहरालगत असलेले हॉटेल व ढाबे सध्या अवैध दारूविक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. येथे दररोज कोट्यवधी रूपयाची दारू विकली जात आहे. परंतु, जिल्हा पोलीस प्रशासन गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे वागत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची पुरती वाट लागली आहे.
वर्धा शहरालगत नालवाडी, पिपरी (मेघे), सिंदी (मेघे), बोरगाव (मेघे), उमरी (मेघे), सेवाग्राम, नागठाणा आदी परिसर येतो. शहराबाहेरून वळणमार्गाही गेलेला आहे. या मार्गालगत गत काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर हॉटेल आणि ढाबे थाटण्यात आले आहेत. कित्येक हॉटेल, ढाब्यांवर जेवणासोबतच दारूची सहज उपलब्ध होत आहे. वर्धा शहरातील अनेक नामांकित हॉटेलातही टेबलाखालून ग्राहकांना दारूचा पुरवठा केला जातो. या हॉटेलमधून दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला आहे. परंतु, आजवर एकाही हॉटेल व ढाब्यावर वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाने छापा घातलेला नाही. या हॉटेलमध्ये कुटुंबासह काही लोकं जेवणासाठी येतात. ही बाब लक्षात घेऊन व्यावसायिकांनी हॉटेलच्या मागील भागात शेड उभारले आहे. येथे शौकिन दारूरंगी रंगताना दिसतात. दारू विक्रीमुळे हॉटेलमालकांचा गल्ला मोठ्या प्रमाणावर वाढत असून या अवैध व्यवसायाला आता अधिकृत धंद्याचे स्वरूप आले आहे. एकट्या वर्धा शहर व परिसरातील ११ गावांची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी वर्धा शहर पोलीस ठाणे, रामनगर, सावंगी आणि सेवाग्राम आदी पोलीस ठाणी कार्यरत आहेत. मात्र, यापैकी कुणाचेही या अवैध दारूविक्रीकडे लक्ष नसल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पालकमंत्र्यांना दिली होती महिलांनी माहिती
वर्धा जिल्हा दारूबंदी आहे. येथे अवैध दारूव्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. याबाबत काहीतरी करा, अशी विनंती जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर महिलांनी केली होती. यासोबतच तिगाव येथील महिलांनीही त्यांची भेट घेतली होती. त्यानंतरही पोलीस प्रशासनाने अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्याच्या अनुषंगाने ठोस पावले उचलली नाही.
अंडीविक्रीच्या गाड्या मुख्य केंद्र
वर्धा शहरात विविध ठिकाणी २५ गाड्यांवरून अंडीविक्री केली जाते. येथेही राजरोसपणे ग्राहकांना दारू उपलब्ध करून दिली जाते. तरीही पोलीस प्रशासन कारवाई करीत नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली आहे. शहरात व जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात खुनाच्या पाच घटना घडल्या. पोलिसांचा दराराच न राहिल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावली आहे.