सात दशकांपासून शहर विकासापासून वंचितच
By Admin | Updated: May 4, 2017 00:51 IST2017-05-04T00:51:21+5:302017-05-04T00:51:21+5:30
कामगारांचे शहर अशी ओळख असलेल्या पुलगाव शहरात सर्व भौगोलिक सुविधा असताना विकासाच्या दृष्टीने ठोस पावले

सात दशकांपासून शहर विकासापासून वंचितच
एकही नवीन उद्योग नाही : जुन्या उद्योगांनाही घरघर, रोजगार संधीची प्रतीक्षा कायमच
पुलगाव : कामगारांचे शहर अशी ओळख असलेल्या पुलगाव शहरात सर्व भौगोलिक सुविधा असताना विकासाच्या दृष्टीने ठोस पावले उचचल्या गेली नाही. त्यामुळे मागील सात दशकात हा परिसर विकासाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिला आहे. काँग्रेसने विकास होऊ दिला नाही, असे म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून शहराच्या विकासाकरिता कोणत्या उपाययोजना केल्या जातात याकडे शहर वासीयांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील नव्हे तर देशाच्या राजकारणात महत्वाचे स्थान मिळविणारे सक्षम नेतृत्व या क्षेत्राने दिले आहे. परंतु शहराच्या विकासाकडे मात्र सर्वच लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांच्या राजवटीत १८८९ साली पुलगाव कॉटन मील व १९४२ साली स्थापन झालेला केंद्रीय दारूगोळा भांडार सोडले तर या भागात सात दशकात कुठलाही दुसरा मोठा उद्योग उभा राहिलेला नाह.
मुंबई-हावडा या रेल्वे मार्गावर असणारे कवठा हे गाव इंग्रज राजवटीत जिल्ह्याचे मुख्यालय होते. गावालगतच बारामाही वाहणारी वर्धा नदी आहे. परिसरातील भौगोलिक परिस्थिती पाहून इंग्रज शासनाने १९६५ साली या नदीवर रेल्वे पुलाची निर्मिती करीत या गावाला ‘ब्रीजटाऊन’ पुलगाव हे नाव दिले. पुढे भौगोलिक परिस्थिती व दळणवळणाची व्यवस्था पाहून १८८९ साली नागपूरच्या बुटी परिवाराने येथे कापड गिरणी सुरू करून विकासाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे हा उद्योग भरभराटीस येवून ३ हजार ५०० कामगारांचा मोठा वस्त्रोद्योग झाला. या शहराचे महत्व व उपलब्ध असलेली भौगोलिक परिस्थिती इंग्रजाचा कळली. म्हणूनच त्यांनी १९४२ साली शहरात देशातील सरंक्षण विभागाचा सर्वात मोठे केंद्रीय दारूगोळा भांडाराची स्थापना करून शहराच्या विकासाला काही प्रमाणात दिशा दिली. मात्र गत काही दशकात शहाराच्या विकासाची गती मंदावल्याचे दिसते.
पुलगाव येथून नागपूर-मुंबई द्रुतगती मार्ग, हैदराबाद-भोपाळ महामार्ग जातो. मात्र येथे एकही मोठा उद्योग उभारलेला नाही. विकासाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या या शहराचा विकास करणे तर सोडाच मात्र पुलगाव कॉटन मील व नॅरोगेज रेल्वेमार्ग बंद करून शासनाने शहराच्या विकासाला पाने पुसली आहे.
या शहरालगत असलेल्या शासकीय पडीत जागेवर औद्योगिक वसाहत स्थापन व्हावी म्हणून तीन दशकापासून शहरावासीयांनी साकडे घातले आहे. परंतु येथील औद्योगिक वसाहतीचे घोडे पेंड खावून पडले ते तीन दशकापाूसन उठलेच नाही. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी अल्प आहे. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येथील भौगोलीक सुविधांची उपलब्धता पाहता विकासाची प्रतीक्षा शहरवासीयांना आहे. (तालुका प्रतिनिधी)